मजुराचा मुलगा ठरला सुवर्णपदकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:43 PM2019-01-21T21:43:58+5:302019-01-21T21:44:16+5:30
आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आई-वडील मोल मजुरी करुन संसाराचा गाडा चालवित असतात. त्यातच घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची झोपडीवजा घर, घरात अभ्यासपूरक वातावरणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीवर मात करीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून एकाचवेळी पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यातून प्रथम येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया गोंदिया तालुक्यातील गंगाझरी येथील एका विद्यार्थ्याने करुन दाखविली आहे.
लष्कर किशोर पाटील असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गोंदिया तालुक्यातील आदिवासीबहुल व मागासलेले गाव म्हणून गंगाझरीची ओळख आहे. किशोर व उमाबाई पाटील यांचा लष्कर हा मुलगा, घरात कुठलाही शिक्षणाचा गंध नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच किशोर व उमा मजुरी करुन आपला संसार चालवितात.मुलाला अभ्यासाची आवड असल्याने आई-वडिलांनी अहोरात्र मेहनत करुन मुुलाला शिकविण्याचा निर्धार केला. त्याला शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट केले. आपल्या शिक्षणासाठी आई-वडील मेहनत घेत आहेत. तेव्हा आपणही मेहनतीने अभ्यास करुन आई-वडीलांचे ऋण फेडावे. अशी मनाशी गाठ बांधून लष्करनेही परिस्थितीवर मात करण्याचे ठरविले. सध्या तो धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थी असून नियमित असलेल्या विज्ञान शाखेबरोबर त्याचे खाजगीरित्या कला व वाणिज्य शाखेची पदविका परीक्षा दिली होती. या तिन्ही परीक्षेत एकाचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून मागासवर्गीय विद्यार्थ्यातून त्याने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शनिवारी (दि.१९) विद्यापीठाच्या १०६ दिक्षांत समारंभात महामहिम राज्यपाल विद्यासागर राव, एच.सी.एल. दिल्लीचे संस्थापक शिव वादर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थ विनायक काणे, प्रभारी कुलगुरु प्रमोद येवले यांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक देऊन गौरविन्यात आले आहे. यापूर्वी त्याने आयआयटी, जॅम परीक्षा गणित विषयातून उत्तीर्ण केली होती हे विशेष. मात्र घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याला आयआयटीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे सर्वप्रथम एखादी शासकीय नोकरी स्वीकारुन घरची हलाखीची परिस्थिती सावरण्याचा मानस त्याने केला आहे. यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आणि आपण युपीएससीच्या परीक्षेत निश्चितच यश मिळवू असा निर्धार त्याने केला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या आई-वडिलांना दिले असून त्यांच्या पुण्याईनेच आपण यशाचे शिखर गाठू असा आत्मविश्वास त्याने बाळगला आहे.