दवनीवाडा तालुका बनवा
By admin | Published: January 9, 2016 02:18 AM2016-01-09T02:18:50+5:302016-01-09T02:18:50+5:30
मागील अनेक वर्षांपासून दवनीवाड्याला तालुका बनविण्याची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दासुद्धा दुर्लक्षिल्या जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे.
पंचायत समिती तयार करा : तालुका व पंचायत समिती निर्माण कार्य समितीची मागणी
गोंदिया : मागील अनेक वर्षांपासून दवनीवाड्याला तालुका बनविण्याची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दासुद्धा दुर्लक्षिल्या जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे. तालुका बनू शकेल येथपर्यंतची मजल दवनीवाड्याने गाठिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी आजही दवनीवाडा तालुका बनण्याची प्रतीक्षा आहे.
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी विचार करून परिसरात शांतता नांदावी व सर्वांगिन विकास व्हावा, या हेतूने ९६ गावांच्या मध्यभागी असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा येथे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. सर्व सोयी-सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सदर गाव व परिसराची उपेक्षा करण्यात येवू लागली. उपेक्षित दवनीवाडा परिसराचा विकास व्हावा, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक प्रगती होवून शासकीय कामकाज अत्यल्प वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्षांचे आमदार, खासदार व अनेक नामदार यांनी दवनीवाड्याच्या नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडेही ही मागणी पूर्ण करणे किती गरजेचे आहे, हे समजावून देण्यासाठी मुंबई व नागपूर विधानसभेच्या बैठकीत शिष्टमंडळाचे नेतृत्व करून सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणूण दिली.
मात्र नवीन तालुके व पंचायत समिती महाराष्ट्रात निर्माण करताना प्रत्येक वेळी ‘तुमची मागणी अवश्य पूर्ण करू’ असेच आश्वासन मिळत गेले. यानंतर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात लाखणी व अर्जुनी नवीन तालुके निर्माण करण्यात आले. परंतु दवनीवाडा तालुका बनविण्याची मागणी अद्यापही थंडबस्त्यात आहे. महाराष्ट्र शासनाने अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याबाबत माहिती मागितली आहे. दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्यासाठी आवश्यक माहिती व तपशीलही शासनाला सादर करण्यात आले आहे. मात्र या मागणीची सतत उपेक्षाच करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
परिसीमन आयोगाची बंदी
दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण कार्य समितीच्या मागणीला शासनाने सन २००६ मध्ये परिसीमन आयोगाने बंदी घातल्याने दवनीवाडा मुख्यालय ठेवून नवीन तालुका निर्माण करण्याच्या मागणीला शासनाकडून मान्य करता येत नसल्याचे पत्र महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबईने पाठवून कळविले होते. त्यात १ आॅगस्ट २००२ पासून लोकसभा, विधानसभा मतदार संघांच्या परिसीमनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय घटकांची पुनर्रचना करून नवीन प्रशासकीय घटक निर्माण करण्यावर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या परिसीमन आयोगाने बंदी घातलेली आहे, असे नमूद होते.
गोंदिया पंचायत समितीचे उपकार्यालय
गोंदिया पंचायत समिती ही गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. या पंचायत समितीचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष््या मोठे आहे. शेतकरी व इतर व्यक्तींना प्रत्येकवेळी पंचायत समितीमध्ये यावे लागते. त्यामुळे अधिक वेळ व पैसा खर्च होतो. ही बाबसन २००५ मध्येच तत्कालीन पं.स. चे उपसभापती रहमतकर यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच पंचायत समिती गोंदियाचे उपकार्यालय दवनीवाडा येथे सुरू करण्याबाबत सूचविले होते. सर्वानूमते तसे ठरवून आवश्यक कर्मचारीवर्ग पुरविण्याची मागणीसुद्धा जि.प. गोंदियाला करण्यात आली होती. मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे?