कुटूंब अर्थसहाय्य योजनेचा निधी त्वरित उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:27 PM2019-05-13T22:27:40+5:302019-05-13T22:28:18+5:30
कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यू झाल्यास मृतकाच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यातंर्गत जवळपास दीडशेच्यावर प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तिरोडा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या योजनेसाठी शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी न मिळाले या योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे.
तर इंदिरा गांधी, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे. कुटूंबातील कुटूंब प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब अर्थसहाय योजनेतंर्गत पत्नी व अथवा कुटुंबीयांना २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. यातंर्गत तालुक्यातील दीडशे लाभार्थ्याचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अन्यथा यात पुन्हा वाढ झाली असती.
घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळते. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. मात्र शासन यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन देत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनातर्फे विविध नवीन योजना सुरू करुन त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र जुन्याच योजनांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने करीत नसल्याचे चित्र आहे.
अतिरिक्त निधीची तरतूद करा
कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनेच्या सुरूवातीला तहसील कार्यालयात अतिरीक्त निधी उपलब्ध करुन दिला जात होता. परिणामी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर होताच आठ दिवसात लाभार्थ्याना अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षापासून या योजनेच्या निधीत कपात करण्यात आली. तसेच अतिरिक्त निधी सुध्दा उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीसारखाच अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची मागणी केली जात आहे.
निराधार मानधनापासून वंचित
तिरोडा तालुक्यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ३१०७, विधवा २९५ आणि २५ दिव्यांग लाभार्थी आहेत. संजय गांधी योजनेचे २७५७ लाभार्थी आहे.या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. पण अद्यापही जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची यादी दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते.
- संजय रामटेके, तहसीलदार, तिरोडा.