आंबेडकरी समाजातील चेतनेचा सकारात्मक उपयोग करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:14 AM2019-03-02T01:14:49+5:302019-03-02T01:15:21+5:30
आजही दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या सामाजिक, आर्थिक समस्या सुटलेल्या नाही. ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षित दुर्बल लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजही दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या सामाजिक, आर्थिक समस्या सुटलेल्या नाही. ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षित दुर्बल लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांना सरकारी योजनांचा अधिक परिणामकारक लाभ घेता यावा, यासाठी आंबेडकरी समाजातील चेतनेचा सकारात्मक वापर करा, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात यांनी येथे आयोजित कार्यक्रमात रविवारी केले.
सामाजिक व आर्थिक समता संघाचे कार्यालय मरारटोली येथील संथागार येथे स्थापन करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूरचे प्रा.गौतम कांबळे, मेडीकलचे डॉ.कृष्णा कांबळे, डॉ.त्रिलोक हजारे, किशोर खांडेकर, बुध्दीस्ट समाज संघाचे भालाधरे उपस्थित होते. थोरात म्हणाले आंबेडकरी समाजात चेतना भरपूर आहे. दृष्टी, चेतना असूनही आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीयदृष्टया समाज अजुनही मागेच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजाचे प्रश्न समजून त्यानुसार धोरणे तयार केली व त्याच्या अंमलबजावणीसाठी भरपूर प्रयत्न केले. त्यामुळेच समाजात प्रगती दिसून येते. गरीबीचा दर कमी झालेला आहे, आरक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. शिक्षणाचा प्रसार वाढला आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ६० ते ७० वर्षांचा विचार केला तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न सुटलेले नाहीत.इतरांच्या तुलनेत आजही अनुसूचित जाती जमाती समाज मागासलेला असल्याचे महाराष्टÑाच्या आकडेवारीवरुन सिध्द होते. दलितांना आपले आर्थिक व सामाजिक प्रश्न पूर्णपणे समजून घ्यावे लागतील. या संघटनेच्या माध्यमातून प्रश्नांचे स्वरुप समजावून त्याच्या आधारावर प्रश्नांची मांडणी केली पाहिजे असे सांगितले. या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रथम आपल्या प्रश्नासाठी शिक्षित व्हावे लागेल व त्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. वेळप्रसंगी मोर्चेसुध्दा काढावे लागेल असे सांगितले. संविधानात मिळालेले अधिकार जर पदरी पाडून घेतले नाही तर भविष्यात यापेक्षाही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय समस्या निर्माण होतील असे असे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी आयोजित कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच स्थापना
सामाजिक व आर्थिक समता संघाची स्थापना ही समाजबांधवाच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल यासाठी केली आहे. या अंतर्गत कार्यशाळा, शिबिर, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करुन जनतेपर्यंत पोहचून जनजागृती करण्यात येणार आहे.