घरकुल लाभार्थ्यांना तीन दिवसात रेती उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:27+5:302021-02-25T04:36:27+5:30
गोंदिया : रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प पडू नये, यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्याचा ...
गोंदिया : रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प पडू नये, यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गोंदिया तालुक्यात या आदेशाची महसूल विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करुन घरकुल लाभार्थ्यांना तीन दिवसात रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आ. विनोद अग्रवाल यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा खनिकर्म विभागाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करुन देण्यासाठी चार रेती घाट राखीव ठेवले आहेत. पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांची यादी मागवून त्यांना रेती उपलब्ध करून देण्यास सर्व तहसील कार्यालयांना कळविले आहे. मात्र, यानंतरही मागील दोन महिन्यांपासून आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे. रमाई, शबरी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गोंदिया तालुक्यात १४ हजार नवीन आणि ३ हजार जुने असे एकूण १७ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, त्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने अनेकांच्या घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हीच बाब लक्षात घेत आ. विनोद अग्रवाल यांनी मंगळवारी या विषयावर तहसील कार्यालयात तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांची बैठक घेतली. तसेच तीन दिवसात घरकुल लाभार्थ्यांच्या यादीनुसार त्यांना रेती उपलब्ध करून देण्यास सांगितले. यानंतर तालुक्यातील बनाथर येथील रेती घाटावरून रेती उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली.