करा एकच निर्धार, आयुष्यात नको क्षयाचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:44 AM2020-09-26T10:44:07+5:302020-09-26T10:44:31+5:30
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: क्षयरोग आणि कोरोना विषाणू हा फुफ्फसावर अनिष्ट परिणाम करीत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षयरूग्णांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (टीबी) नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा मुख्यत्वे फुफ्फसाचा आजार असून रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व कुपोषित व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता असते.
कोरोना व क्षयरोग
एक क्षयरोगी १० ते १५ व्यक्तीपर्यंत हा आजार पसरवू शकतो. आजार होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. जगभरात कहर करणारा कोरोना साथरोग व एड्ससारखे मोठे आजार थांबविण्यासाठी रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. क्षयरोगाचा सांसर्गिक रूग्ण ज्याने परिणामकारक व संपूर्ण उपचार घेतला नाही,अशांसाठी जीवाणूचा स्त्रोत ठरतो.
असा होतो क्षयरोग
ज्यावेळी क्षयरोगाचा जीवाणू श्वासावाटे फुफ्फसात प्रवेश करतो. काही दिवसांनी लक्षणे दिसल्यास त्याला फुफ्फसाचा क्षयरोग म्हणतात. काही रूग्णांमध्ये या जीवाणूंचा मेंदू मूत्रपिंड हाडे त्वचेपर्यंत प्रसार होऊ शकतो. मुले व एचआयव्हीग्रस्तांना क्षयरोग हा अत्यंत गंभीर ठरतो. क्षयरोगाचा संसर्गजन्य असून खोकणे व थुंकीदिवारे जीवाणू बाहेर टाकतो. हे जिवाणू हवेमध्ये पसरतात.काही काळ जिवंत राहून निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिली.
क्षयरोग दुरूस्ती ९० टक्के
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्र मांतर्गत तपासणी व इतर आधुनिक चाचण्यांद्वारे क्षयाचे निदान झाल्यानंतर औषधी पॅकमध्ये दिली जाते. याचा उपचार आरोग्य सेवकाच्या देखरेखीखाली केला जातो. नियमित औषधे घेतल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे.
क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. दररोज एक हजार व्यक्ती क्षयरोगाने मृत्यूमुखी पडतात.
डॉट्स उपचार, टीबीपासून मुक्तीकडे
संशयीत व दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणाºया व्यक्तींची थुंकी सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून आजाराचे निदान केले जाते. काही रूग्णांमध्ये क्ष-किरण तपासणी, प्रयोगशाळेत तपासणी व इतर आधुनिक चाचणीद्वारे करता येते. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रूग्णनिहाय औषधी पॅकमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार आरोग्य कार्यकर्त्यांच्या समक्ष देखरेखीखाली केला जातो. त्याला डॉट्स पद्धत म्हटले जाते.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, छातीत दुखने, दम लागणे, ताप येणे विशेषत: रात्री, भूक कमी लागणे, खोकतांना थुंकी वाटे रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.
क्षयरोग झालेल्या किंवा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णांना कोरोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हायरिक्समध्ये येणाºया रूग्णांचे उपचाराकडे आरोग्य प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची तपासणी सुरू आहे.
_ डॉ.रा.ज.पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी गोंदिया.