मलेरिया डेंजरस, जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद; दोनजणांचा बळी
By कपिल केकत | Published: September 9, 2023 06:48 PM2023-09-09T18:48:21+5:302023-09-09T18:49:10+5:30
जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद : डासांपासून सावध राहणेच गरजेचे
कपिल केकत
गोंदिया : जिल्ह्यात सध्या विविध आजारांची साथ सुरू असून, जिल्हावासी पार त्रासून गेले आहेत. त्यातच आता धक्कादायक बाब म्हणजे जिल्हावासीयांच्या जिवावर डास उठले असून, मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्याची नोंद घेण्यात आली आहे. यावरून डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त डेंजरस असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात आठ महिन्यांत मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. अशात जिल्हावासीयांनी डासांपासून जास्त सावध राहणेच गरजेचे झाले आहे.
----- पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचाच काळ असतो. जिल्ह्यात डोळ्यांची साथ जेमतेम आटोक्यात आली असतानाच आता तापाच्या साथीने जिल्हा फणफणला आहे. यामध्ये व्हायरल, टायफॉईडचा ताप असतानाच आता मलेरियाच्या तापाने ताप वाढविला आहे. जिल्ह्याला डासांचे ग्रहण असून, काही केल्या येथून डासांचा नायनाट करणे शक्य नाही अशी स्थिती आहे. ही बाब गोंदिया शहरापुरतीच लागू होत नसून, अवघ्या जिल्ह्यालाच डासांनी ग्रासून सोडले आहे. डासांपासून मलेरिया व डेंग्यूचा जास्त प्रमाणात धोका दिसून येतो. त्यातही डेंग्यू म्हणताच भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त जीवघेणा ठरताना दिसत आहे.
--- या वर्षात ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे, दोन रुग्णांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे. यातील एक तिरोडा तालुक्यातील असून, दुसरा रुग्ण सडक-अर्जुनी तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात डेंग्यूच्या ७९ रुग्णांची नोंद घेण्यात आली असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्यामुळे डासांपासून धोका अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
-------------------------------------
सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात
- सालेकसा तालुका जिल्ह्यात आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, याच तालुक्यात मलेरियाचे सर्वाधिक ८७ रुग्ण आढळून आले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर त्याला लागूनच असलेल्या देवरी तालुक्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गोरेगाव तालुका असून, २१ रुग्ण आढळून आले आहेत, तर सर्वांत कमी गोंदिया व तिरोडा शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
----------------------------------
ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक रूग्ण
- पावसाळ्यात सर्वाधिक आजार फोफावत असून, डासांचाही जोर याच काळात वाढतो. मात्र, या काळात मलेरिया व डेंग्यूचा धोका जास्त असतो असे दिसून येते. कारण, जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत, तर ऑगस्ट महिन्यात ९३ रुग्ण आढळून आले असून याच महिन्यात दोन रुग्णांचा जीव गेला आहे.
--------------------------------------------
आवश्यक ती खबरदारी झाली गरजेची
- डासांवर उपाय म्हणून हिवताप विभागाकडून ग्रामीण भागात फवारणी व सर्वेक्षण केले जाते. शहरात नगर परिषद फवारणी करते. मात्र, त्यांची फवारणी किती प्रभावी असते हे सर्वांनाच ठावुक आहे. अशात आता नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी डासांपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी आतापासून घेण्याची गरज आहे.
---------------------------------
जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका- जानेवारी ते ऑगस्ट- फक्त ऑगस्ट - मृत्यू
गोंदिया- ०७- ०५-००
तिरोडा- २१-१४-०१
आमगाव- ०६-००-००
गोरेगाव- २४-१०-००
देवरी- २८-१५-००
सडक-अर्जुनी- १२-०६-०१
सालेकसा- ८७-३४-००
अर्जुनी-मोरगाव- १५-०८-००
गोंदिया शहर- ०१-००-००
तिरोडा शहर- ०१-००-००