संशयित हत्तीरोग रुग्णाबाबत हिवताप विभाग उदासीन
By admin | Published: August 18, 2014 11:33 PM2014-08-18T23:33:42+5:302014-08-18T23:33:42+5:30
शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार
गोंदिया : शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार मात्र हवेतच दिसून येत आहे. त्या संशयित रूग्णाबाबत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेच कर्मचारी पाठवून रक्ताचे नमुने मागवून घेतो, असे आश्वासन दिले होते. मात्र सोमवारपर्यंत त्यांचा कर्मचारी रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेला नव्हता. यावरून आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकाविणारा कर्मचारी किती निगरगट्ट आहे हे दिसून येते.
सध्या डेंग्यू व मलेरियाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. शहारतही आता डेंग्यूचे रूग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातल्या त्यात शनिवारी (दि.१६) येथील नगराध्यक्षांच्या प्रभागात येणाऱ्या वसंतनगर भागात मधुकर बेहलपांडे नामक इमसात हत्तीरोगाची लक्षणे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत सदर प्रतिनिधीने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांना माहिती दिली. यावर डॉ. पाटील यांनी संशयित व्यक्तीच्या रक्ताचे नमुने रात्रीलाच घ्यावे लागत असल्याचे सांगत कर्मचारी पाठवून नमुने मागवून घेतो असे सांगितले होते.
विशेष म्हणजे डॉ. पाटील यांनी सांगितल्यानंतरही सोमवारपर्यंत (दि.१८) त्यांच्या विभागातील कर्मचारी रक्ताचे नमुने घेण्यासाठी बेहलपांडे यांच्याकडे गेला नव्हता. बेहलपांडे यांना मंगळवारी त्रास उद्भवला व शनिवारी केटीएस रूग्णालयात गेल्यावर त्यांचे रक्ताचे व लघवीचे नमुने घेण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांचे नमुने घेऊ न त्यात ते पॉझिटीव्ह आढळल्यास त्वरीत त्यांच्यावर उपचार सुरू करून हा रोग आटोक्यात आणला जाऊ शकतो. शिवाय शहरात हत्तीरोगाचा रूग्ण आढळणे ही जिल्हा प्रशासनासह हिवताप विभागासाठी अत्यंत गंभीर बाब आहे.
यामुळेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांनीही लगेच नमुने मागवितो असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र विभागाचा कर्मचारी संबंधीत व्यक्ती जाऊन रक्ताचे नमुने घेत नाही यावरून हिवताप विभाग आपल्या जबाबदारी प्रती किती तत्पर आहे हे दिसून येते. अशात अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवशावर जिल्हावासी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)