गोंदिया जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; पुरुष व महिला वैमानिकांचा मृत्यू 

By अंकुश गुंडावार | Published: March 18, 2023 06:54 PM2023-03-18T18:54:07+5:302023-03-18T21:20:36+5:30

Gondia News बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमानाचा शनिवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान अपघात होऊन एक पुरुष व एक स्त्री वैमानिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Male and female pilots killed in training plane crash | गोंदिया जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; पुरुष व महिला वैमानिकांचा मृत्यू 

गोंदिया जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; पुरुष व महिला वैमानिकांचा मृत्यू 

googlenewsNext

 

अंकुश गुंडावार

गोंदियाः वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्राच्या विमानाला अपघात झाल्याने प्रशिक्षकासोबतच प्रशिक्षणार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास लांजीपासून १२ किमी अंतरावर कोसम जंगलातील टेकडीवर उघडकीस आली. या अपघातात ठार झालेल्या प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) मोहित ठाकूर तर महिला पायलटचे नाव वृशंका असल्याचे सांगितले जाते.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलिस स्टेशन हद्दीतील कोसमरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भक्कूटोला जंगलातील टेकडीवर हा अपघात झाला. प्रशिक्षणार्थी विमान अपघातग्रस्त ठिकाणी अचानक हेलकावत टेकडीवर आदळले. विमान कोसळताच आग लागली असावी. विमान काही सेकंदातच डोंगरावरून खाली कोसळले असावे, असा अंदाज लावला जात आहे.

विमान परतलेच नाही, शोधाशोध

१७ मार्च रोजी दुपारी बिसरी विमानतळावरून शिकाऊ विमानाने उड्डाण घेतले. परंतु ते परत न आल्याने त्या विमानाचा शोध सुरू झाला. परिणामी, दुसऱ्या दिवशी १८ मार्चला दुपारी तीन वाजताच्या सुमारास विमान अपघातग्रस्त झाल्याचे उघडकीस आले. याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

१३ वर्षांत घडले पाच अपघात...

बिरसी येथील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील विमानांचा अपघात किंवा प्रशिक्षणार्थ्यांचा मृत्यू अशी पाच प्रकरणे १३ वर्षांत घडली आहेत. २०१० मध्ये विमानतळावरून उडालेले विमान मध्य प्रदेशातील लांजी येथे इमर्जन्सी लँडिंगच्या माध्यमातून उतरविण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी विमान पूर्णत: क्षतिग्रस्त झाले होते. १८ मार्च २०१३ रोजी प्रशिक्षणार्थी विमान थेट रनवेबाहेर येऊन एका वाहनात शिरले होते. २४ डिसेंबर २०१३ रोजी रायबरेली येथील प्रशिक्षणार्थी विमानाचा (डायमंड ४०) मध्य प्रदेशातील पचमढी परिसरात अपघात होऊन सोहेल अन्सारी या पायलटचा मृत्यू झाला होता. मार्च २०१७ मध्ये दोन प्रशिक्षणार्थींचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. २६ एप्रिल २०१७ रोजी देवरी गावाजवळील वैनगंगा नदी परिसरात डीए ४२ क्रमांकाचे हे चार आसनी विमान डायमंड कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता. यात वरिष्ठ प्रशिक्षक रंजन आर. गुप्ता (४५) व प्रशिक्षणार्थी हिमानी गुरुदयाल सिंग कल्याणी (२४, रा. दिल्ली) यांचा मृत्यू झाला होता.

सुविधांयुक्त विमानतळ

बिरसी विमानतळ सर्व सुविधांयुक्त आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्रदेखील आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्रावर केंद्र शासनाच्या इग्रो या उत्तर प्रदेशातील वैमानिक प्रशिक्षण केंद्र आणि एका खासगी प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतात.

ब्लॅक बाॅक्सच्या तपासणीनंतरच उलगडा

घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (नक्षल) आदित्य मिश्रा यांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अपघातात पूर्णत: मोडकळीस आलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्लॅक बाॅक्सच्या तपासणीनंतरच विमानात बिघाड आला होता की नाही, याचा उलगडा होणार आहे.

Web Title: Male and female pilots killed in training plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात