पुरूष नसबंदीत गोंदिया राज्यातून दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 01:16 AM2017-07-17T01:16:52+5:302017-07-17T01:16:52+5:30
सन २०१६-१७ मध्ये पुरूषांची नसबंदी करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सत्कार : आठ हजार ४२६ महिला-पुरूषांच्या शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०१६-१७ मध्ये पुरूषांची नसबंदी करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. जि.प. गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे यांनी गौरव चिन्ह स्वीकारले.
याप्रसंगी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, खा. अरविंद सावंत, आरोग्य सचिव डॉ. विजय सतबीरसिंग, संचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल आदी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात नऊ हजार २०० इतके कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते. या कालावधीत आरोग्य यंत्रणेने जिल्हाभरातील आठ हजार ४२६ जणांच्या शस्त्रक्रिया केल्या. यात एक हजार ५३४ पुरूष व सहा हजार ८९२ महिलांचा समावेश आहे.
लहान कुटुंबाबाबत जनजागृती होत असल्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामध्ये स्त्रियांचीच नसबंदी करण्याचे प्रमाण राज्यभरात अधिक आहे. स्त्री नसबंदीच्या तुलनेत पुरूषांची नसबंदी सोपी व कमी त्रासदायक आहे. त्यामुळे पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याबाबत जनजागृती केल्याने पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात सुमारे एक हजार ५३४ पुरूषांनी नसबंदी केली आहे.