माल्थसने मांडलेला सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:13+5:302021-05-27T04:31:13+5:30

विजय मानकर सालेकसा : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचे अभ्यासक मानले जाणारे थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी ...

Malthus's theory is relevant | माल्थसने मांडलेला सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

माल्थसने मांडलेला सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

googlenewsNext

विजय मानकर

सालेकसा : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचे अभ्यासक मानले जाणारे थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडला होता. त्यांनी म्हटले होते की, ‘वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येवर माणसाने जर कोणतेही उपाय केले नाही तरी एक दिवस असा येईल की, निसर्गाद्वारे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण केले जाईल. अर्थात ठरावीक काळानंतर जगात दुष्काळ, रोगराई, युद्ध, पूर, भुकंप, भूखमरी, चक्रीवादळ यासारख्या असंख्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपदा उद्‌भवतील आणि आपोआप लोकसंख्या नियंत्रणात येईल.’ आजघडीला कोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगात तांडव माजवलेले असून करोडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय इतरही नैसर्गिक प्रकोप पाहायला मिळत आहेत. त्यातूनही कित्येकांना प्राण गमवावे लागत आहेत.

थॉमस माल्थस यांनी १७९८ मध्ये आपले लोकसंख्यावाढीबद्दलचे विचार मांडले होते. माल्थस यांच्या मते, कोणत्याही देशाची लोकसंख्या नेहमी भूमितीय गुणोत्तराने वाढत जाते, तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल. अशा अन्नपदार्थाची त्या देशाची निर्मिती फक्त अंकगणितीय गुणोत्तरानेच वाढत जाते. अर्थात लोकसंख्यावाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा नेहमीच जास्त असतो. पुढे जाऊन अन्नधान्याची मोठी कमतरता निर्माण होऊन भूकबळी व महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लोक मृत्यूला कवटाळतील आणि लोकसंख्या नियंत्रणात येईल, असेही माल्थस यांनी म्हटले होते.

आज वर्तमान जगाची परिस्थिती पाहता माल्थस यांनी केलेले भाकीत प्रासंगिक ठरताना दिसत आहेत. अनेक मानवनिर्मित तर काही निसर्ग प्रदत्त संकटांमुळे आज मानव जातीलाच नाही तर इतर प्राणी जगत मृत्यूच्या वाटेवर निघालेले दिसत आहे.

चीनच्या वुहान शहरातून निघालेला अदृश्य शत्रू कोविड-१९ याने पाहता पाहता संपूर्ण जगात शिरकाव केला असून, आता हा प्रत्येक देशाच्या गावागावात आणि घराघरात मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून जीव घेत आहे. विशेष म्हणजे, आर्थिकदृष्ट्या संपन्न देशसुद्धा आज कोरोनापुढे हतबल झालेले दिसून आले. कोरोनाने दाट लोकसंख्येच्या देशात, राज्यात आणि शहरात जबरदस्त हल्ला केला असून, सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणाला ओसाड बनविण्याचे काम करीत आहे. युरोप आणि अमेरिका खंडात अनेक प्रांतांत १० टक्क्यांपर्यंत लोकसंख्या कोरोनामुळे कमी झालेली आहे. मागील दोन वर्षांपासून अनेक देशांत कोरोनाची दोन-तीनदा लाट येऊन गेलेली असून, या प्रत्येक लाटेत लाखोंचा बळी गेलेला आहे. मागील दोन वर्षांत जगातील १६ कोटी ५५ लाख ६९ हजार ८९३ लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ लाख ३१ हजार ७०९ लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर १४ कोटी ४६ लाख ७ हजार ९२५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात कोरोना महामारीचा विचार केला तर भारतात आतापर्यंत २ कोटी ५७ लाख ७२ हजार ४४० लोकांना कोरोना संक्रमण झाले असून, त्यापैकी २ लाख ८७ हजार १५६ लोकांचा बळी गेलेला आहे, तर २ कोटी २३ लाख ५५ हजार ४४० लोकांनी कोरोना युद्ध जिंकलेले आहे. कोरोनाची बाधा आणि मृ्त्यू भारतात खूप वेगाने सुरू असून, हा केव्हा आणि कसा थांबेल हे सांगणे कठीण आहे. आजघडीला आतापर्यंत जवळपास ३ लाख लोकांचा कोरोनाबळी जाताना दिसत आहे. एवढी जीवितहानी कोणत्याही देशासाठी मोेठे दुर्दैव म्हणावे लागेल; परंतु काही वेळासाठी देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत ००.२२८ टक्के लोकांचा बळी गेलेला आहे.

भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला असून, एक वर्षासाठीचे धान्य जास्तीचे भरून पडलेले आहे. अशात देशाने माल्थसच्या सिद्धांताला घोडचूक ठरविण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे; परंतु येणारा काळ कदाचित भारतासाठी मोठ्या संकटाचा ठरू शकतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यासाठी काही आकडे सादर केल्यास ही शंका बळावणे स्वाभाविक असेल.

भारत जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असून, पृथ्वी तळावरील एकूण भूमीपैकी भारतात फक्त २.४ टक्के भूमी आहे. तसेच भारताची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या १८.०४ टक्के एवढी झालेली आहे, सोबतच शेजारी राष्ट्र चीनची लोकसंख्या १८.२५ टक्के आहे. येत्या काही वर्षांतच लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकून जगात सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश बनेल; परंतु त्याचबरोबर भारतात आवाहनेसुद्धा वाढतील. असे म्हटले जाते की, येत्या पाच दशकांत किंवा त्याआधीच भारत-चीन या दोन देशांतच जगाची निम्मी लोकसंख्या असेल. दुसरीकडे कृषी भूमी व इतर साधने मर्यादित राहतील आणि कदाचित त्यावेळी देशात मोठा लोकसंख्या विस्फोट होईल. अन्नाची कमी भासेल, लोक भुखमरीला बळी पडतील. एकामागून एक महामारी येईल. आपल्या गरजा भागविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागेल, तेव्हा युद्ध, मार-काट देशात तर होईल. त्याचवेळी भूकंप, महापूृर, चक्रीवादळ, दुष्काळासारखे प्रलयकारी प्रसंग निर्माण होतील. अशात लोकांना आपला जीव वाचविणे अशक्य होईल आणि माल्थसने मांडलेला सिद्धांत पुन्हा खरा ठरेल; हे निश्चित असेल, तरी या घटनांना बराच वेळ लागतो. मात्र, एक सर्वांत मोठे संकट दार ठोठावत आहे. ते म्हणजे महायुद्ध आणि त्यामध्ये अणुबाॅम्बचा संभाव्य वापर. सध्या काही देशांत आल्या-गेल्या हल्ले-प्रतिहल्ले चालले आहेत. याचे रूपांतर उग्र रूपात होईल. कोरोनामुळे चीनविरोधात साऱ्या जगाचा राग तसेच शस्त्रसाठा वाढविण्याची स्पर्धा देशादेशात चालली असून, याचा परिणाम एक दिवस भयानक महायुद्धाच्या रूपात दिसेल. यात जगातील किती लोक, शहरे आणि देश नष्ट होतील, हे अकल्पनीय आहे. मात्र, माल्थसने मांडलेले मत आणि सिद्धांत प्रासंगिक व खरा सिद्ध होण्याला सुरुवात झालेली आहे. एवढे मात्र नक्की.

Web Title: Malthus's theory is relevant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.