चारित्र्याच्या संशयाने केला घात; जळीतकांडातील ‘आरती’चाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:56 PM2023-02-22T12:56:34+5:302023-02-22T13:00:28+5:30

पेट्राेल ओतून सासऱ्यासह मुलगा आणि पत्नीला पेटविले

man burns father-in-law, wife and child with petrol in gondia; all died during treatment | चारित्र्याच्या संशयाने केला घात; जळीतकांडातील ‘आरती’चाही मृत्यू

चारित्र्याच्या संशयाने केला घात; जळीतकांडातील ‘आरती’चाही मृत्यू

googlenewsNext

गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने ‘ती’ मुलांना घेऊन माहेरी आली. माहेरी घरकाम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पत्नीला सुखाने जगू न देता तिच्यासह सासरा व मुलावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. रामनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्याटाेला येथे १४ फेब्रुवारी राेजी ही घटना घडली. त्यात सासऱ्याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर एका दिवसाने मुलाचा मृत्यू झाला, तर सात दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या ‘आरती’चाही मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर समाजमन अस्वस्थ झाले असून आराेपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

किशोर श्रीराम शेंडे (वय ४०, रा. भिवापूर, ता. तिराेडा) असे माथेफिरू आराेपी पतीचे नाव आहे. वारंवार संशय घेत असल्याने पत्नी आरती किशोर शेंडे (३०) ही मुलगा आणि मुलीसह सूर्याटाेला येथे वडिलांकडे आली. दरम्यान, आराेपी तेथे आला आणि त्याने पेट्राेल ओतून सासऱ्यासह पत्नीला आणि मुलाला पेटवून दिले. त्यात सासरा देवानंद शीतकू मेश्राम (५२) यांचा १५ फेब्रुवारी रोजी पहाटेच मृत्यू झाला. आरोपी किशोर शेंडे याचा मुलगा जय किशोर शेंडे (५, रा. भिवापूर) या चिमुकल्याचा नागपूर येथे १५ फेब्रुवारी रोजी रात्री मृत्यू झाला. आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे (३०) ही मृत्यूशी झुंज देत असताना तिची प्राणज्योत २१ फेब्रुवारी रोजी सकाळी मालवली. आरोपीवर रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७, ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे याला भिवापूर येथील शेतशिवारातून रामनगर पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पाेलिस काेठडी संपताच न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

कुटुंबाची राखरांगोळी

किशोर हा पत्नी आरतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून मारहाण करायचा. या मारहाणीला त्रस्त होऊन आरती माहेरी आली होती. माहेरी आल्यावरही त्याने भांडण केले होते. यातून हे कृत्य केले आहे, असे समीर देवानंद मेश्राम (वय २८, रा. सूर्याटोला) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चारित्र्याच्या ठिणगीने त्याच्या संसारात मोठी आग लागली. या आगीत पत्नी, मुलगा व सासरा यांची राख झाली. संशय घेणारा किशोर तुरुंगात आहे.

स्वरांजली झाली पोरकी

- १४ फेब्रुवारी रोजी स्वरांजली दिवसाला भावासोबत खेळली. परंतु, रात्री स्वरांजली ही आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती व त्यामुळे ती या घटनेपासून वाचली. वडिलांच्या अमानुष कृत्याने आजोबा, आई व भावाचा जीव गेला. स्वरांजली पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: man burns father-in-law, wife and child with petrol in gondia; all died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.