'हे माझे शेवटचे बोलणे.. मरणाला येशील'; पत्नीशी संवाद साधत 'त्याने' घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 05:02 PM2022-05-25T17:02:20+5:302022-05-25T17:04:43+5:30
जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. भाऊ मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. परंतु, घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती.
बोंडगावदेवी (गोंदिया) : पत्नी, २ मुले व आई सोबत एकत्र राहून संसाराचा गाडा ओढणारा गुलाब एकाएकी दारूच्या आहारी गेला. गुण्यागोविंदाने त्यांचा संसार फुलत होता. या सुखी संसाराला काळाची नजर लागली. अत्र्यांच्या ‘एकच प्याला’ नाटकाप्रमाणे गुलाबने आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी केली.
गळफास घेण्यापूर्वी गुलाबने पत्नीशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. 'हे माझे शेवटचे बोलणे! ‘मी आता मरतो... मरणाला येशील' असे बोलून स्वत:च्या शेतशिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. मन हेलावणारी ही घटना मंगळवारी (दि. २४) अर्जुनी माेरगाव तालुक्यातील येरंडी विहीरगाव येथे घडली. गुलाब महादेव हेमणे (३७ वर्षे) असे त्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील महादेव हेमणे यांना मंगेश व गुलाब अशी दोन मुले, दोघांचेही लग्न होऊन वैवाहिक जीवन जगत आहेत. वडिलोपार्जित ४ एकर जमीन. दोन भावांचे वेगवेगळे कुटुंब, गुलाब हा लहान मुलगा असल्याने आई वडिलांसोबत पत्नी व २ मुलांसह स्वतंत्र राहत होता. जुलै २०२१ मध्ये वडिलांचा मृत्यू झाला. गुलाबकडे ३ एकर शेतजमीन होती. पत्नी आशा, मुलगा सूरज (११), सोहम (७) व आई असे ५ जणांच्या कुटुंबाचा गुलाब हा कर्ता पुरुष.
दही-दूध विकणे, शेती करून कुटुंबाची घडी बऱ्यापैकी बसवली होती. घरामध्ये सर्व आनंदीमय वातावरण. सर्व व्यवस्थित कारभार सुरू होता. सासुरवाडी परसटोला (एकोडी) येथे वैवाहिक कार्यक्रम असल्याने गुलाब आपल्या कुटुंबासह गावाला गेला होता. रब्बीच्या हंगामातील धानाचे पीक कापणीला आल्याचे सांगून पत्नी व मुलांना सासुरवाडीमध्ये ठेवून सोमवारी रात्रीपर्यंत गुलाब स्वगावी परतला. मोठा भाऊ मंगेशकडे रात्रीचे जेवण केले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळच्या वेळी तेंदूपत्त्याचे १५०० रुपये फळी मुन्शीकडून मागून घेतले. गावातील घराशेजारील ओळखीच्या बाईला ‘मरणाले येशील’ असे म्हणून गुलाब घरातून बाहेर निघून गेला.
‘हे माझे आता शेवटचे बोलणे..’
मंगळवारी घटनेच्या दिवशी गावाजवळील बाक्टी येथे गेला, काहींचे उधार पैसे त्यांनी दिले. अति मद्य सेवन करून त्याने घराची वाट न धरता आपल्या शेतशिवाराची वाट धरली. कोणतेही टेन्शन, त्रास, कर्जबाजारीपणा नसताना सुद्धा गुलाबने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन शेतामध्ये गेला. गळफास घेण्यापूर्वी त्याने पत्नी आशाला मोबाईलवरून फोन करून 'हे माझे शेवटचे बोलणे आहे! मी मरतो... मरणाले ये जो' एवढे बोलून गुलाबने आपल्या लहान २ मुलांचा, पत्नीचा विचार न करता शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली.
भाऊ शेतात पोहोचेपर्यंत प्राणज्योत मालवली
जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. फोन येताच मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात आली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून येरंडी गावात सायंकाळी गुलाबवर अंतिम संस्कार करण्यात आले.