ज्ञान व कर्मानेच मनुष्य मोठा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:30 PM2017-11-28T22:30:22+5:302017-11-28T22:30:45+5:30
कोणत्या व्यक्तीला मोठे म्हणावे, त्याची संकल्पना कोणती याबाबत तर्कवितर्क लावले जातात.
आॅनलाईन लोकमत
सडक-अर्जुनी : कोणत्या व्यक्तीला मोठे म्हणावे, त्याची संकल्पना कोणती याबाबत तर्कवितर्क लावले जातात. परंतु ज्याच्यांजवळ ज्ञान आणि कर्म आहे, असाच व्यक्ती मोठा होतो. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान आणि कर्माने मोठे झाले. त्यामुळे त्यांचा आदर्श आपण सर्व घेतो, असे मत सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी येथे व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फाऊंडेशन गोंदिया-भंडाराच्यावतीने येथील दुर्गा चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी भाऊदास जांभूळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. खुशाल बोपचे, मनोहर चंद्रिकापुरे, प्रा.आर.के. भगत, राजू भेलावे, रियाज सय्यद, वडेगावचे सरपंच हेमराज खोटेले, आंबेडकर फाऊंडेशनचे महासचिव रमेश घरडे, सरपंच दिनेश हुकरे, हरिश कोहळे, सुशील लाडे, शिवदास साखरे, बिरला गणवीर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बोपचे यांनी, संविधान दिनामुळे ओबीसी समाजाला जागे होण्याची व जागे करण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम ३४० नुसार दिलेल्या आरक्षणामुळे त्यांना फायदा झाला आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा फायदा आपल्याला किती झाला आणि इतर लोकांना किती झाला, हे समजून घ्यावे. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी पूजनिय असून सर्वांनी संविधान समजून घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यानंतर प्रा.आर.के. भगत, सुशील लाडे, शिवदास साखरे, हरिश कोहळे, दिनेश हुकरे यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून यथायोग्य मार्गदर्शन केले. संचालन भाऊदास जांभूळकर यांनी केले. आभार निलकंठ फुले यांनी मानले.