वृक्ष लागवडीला लोकचळवळ करा
By admin | Published: June 10, 2016 01:47 AM2016-06-10T01:47:23+5:302016-06-10T01:47:23+5:30
जागतिक तापमानात झालेली वाढ व प्रदुषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : १ जुलैच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे नियोजन
गोंदिया : जागतिक तापमानात झालेली वाढ व प्रदुषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. उद्भवणारी पूर परिस्थिती व दुष्काळ हे सुध्दा पर्यावरणाचा असमतोल बिघडण्यास कारणीभूत आहेत. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेसाठी येत्या १ जुलै रोजी करण्यात येणारा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्ह्यात लोकचळवळ म्हणून राबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १ जुलै रोजी राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र माच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तयारीचा आढावा डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर व सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे जीपीएस सिस्टीमवर अपलोड होणार आहे. यासाठी लागणारा निधी, खड्डे व रोपांच्या अडचणीबाबत काही तक्रारी असल्यास तातडीने संपर्क साधावा. रोपे लावण्यासाठी १५ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत यंत्रणांनी खड्डे तयार करावे. १० जूनपर्यंत संबंधित यंत्रणेच्या सर्व समन्वयकांच्या मोबाईल सेटवर आवश्यक ते सॉफ्टवेअर अपलोड करावे. १ जुलैचा वृक्ष लागवड कार्यक्रम हा शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्र म आहे. कोणत्याही यंत्रणेने या कामात हलगर्जीपणा करु नये. अत्यंत काळजीपूर्वक वृक्ष लागवडीचा कार्यक्र म लोकांना सोबत घेऊन यशस्वी करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
विविध यंत्रणांसह रुग्ण कल्याण समिती, शाळा व्यवस्थापन समिती, संयुक्त वनव्यवस्थापन समिती यासह गाव पातळीवरील महिला बचतगटांना या कार्यक्र मात सहभागी करु न घ्यावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी यंत्रणांना दिले. यावेळी सीईओ डॉ.पुलकुंडवार, डिएफओ डॉ.रामगावकर यांनीही मार्गदर्शन केले.जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत ९ लाख ७२ हजार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील कुडवा- २५ हजार, गोंडमोहाडी- २० हजार ७७२, किकरीपार- १० हजार, देवरी- ३७६२, भागी- १५ हजार, डव्वा- ११ हजार ३७५, निमगाव- ३० हजार ७००, मालकनपूर- ५० हजार, मुरदोली- ५० हजार इतकी रोपटी रोपवाटिकेत वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध राहतील अशी माहिती उपसंचालक प्रदीप बडगे यांनी दिली. (प्रतिनिधी)