चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 05:31 PM2023-02-18T17:31:50+5:302023-02-18T17:44:01+5:30

गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळून जाळल्याची घटना घडली होती

man who burns father-in-law, wife and child with petrol arrested; only grandmother and granddaughter survived in a gory vendetta incident | चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या

चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या

Next

गोंदिया : शहराजवळील सूर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारी (दि. १५) पहाटे १ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात आरोपी हा आपल्या कुटुंबाला व सासऱ्याच्या कुटुंबाला संपवायला निघाला होता. परंतु त्याची मुलगी स्वरांजली ही घटनेच्या दिवशी आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती. त्यामुळे ती या घटनेपासून वाचली, तर आरतीची आई ममता मेश्राम या आपल्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या नवीन घराकडे असल्यामुळे त्या सुद्धा बचावल्या.

सूर्याटोला येथील सासरा देवानंद सीतकू मेश्राम (५२), आरती शेंडे व जय शेंडे या तिघांवर आरोपी किशोर शेंडे याने पेट्रोल टाकून जाळले. आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे (४०, रा. भिवापूर, ता. तिरोडा) याला भिवापूर येथील शेतशिवारातून रामनगर पोलिसांनी अटक केली. या घटनेत देवानंद मेश्राम व जय शेंडे या दोघांचा मृत्यू झाला. घटनेच्या रात्री आरोपीचा साळा हा मजुरीसाठी बालाघाट येथे गेला होता. आरोपीची मुलगी स्वरांजली ही आत्याच्या घरी गेली होती.

बायको माहेरी गेल्याचा काढला राग; सासरा, पत्नी व मुलाला जाळणाऱ्याला अटक

सासू ममता मेश्राम या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या कामाच्या देखरेखीसाठी त्या नवीन घराकडे होत्या. देवानंद मेश्राम, आरती शेंडे आणि जय शेंडे हे तिघेच घरी असल्याने त्या तिघांना त्याने जाळून तो पसार झाला होता. अटक झालेल्या आरोपीने या घटनेची कबुली पोलिसांना दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.

चारित्र्याच्या संशयाने केला घात

आरोपी किशोर व आरती यांचे सन २०१३ ला लग्न झाले. तेव्हापासून तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्याने तिला अनेकदा मारहाण केली. या मारहाणीला त्रस्त होऊन ती महिनाभरापूर्वी लेकरांना घेऊन माहेरी आली होती.

तिरोडा पोलिसात मारहाणीच्या केल्या होत्या तक्रारी

किशोर शेंडे मारहाण करीत असल्याने त्याच्या विरोधात आरतीने तिरोडा पोलिस ठाण्यात मारहाण केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे तिरोडा पोलिसात या आरोपीवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आरती तीन दिवसांपासून बेशुद्धच

या घटनेत आरती शेंडे ही ४० ते ५० टक्के भाजल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तीन दिवसांपासून ती शुद्धीवर आली नाही. गोंदिया आणि नागपुरातील डॉक्टरांनी ती बयाण देण्याच्या स्थितीत नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: man who burns father-in-law, wife and child with petrol arrested; only grandmother and granddaughter survived in a gory vendetta incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.