बायको माहेरी गेल्याचा काढला राग; सासरा, पत्नी व मुलाला जाळणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:14 PM2023-02-17T12:14:10+5:302023-02-17T12:23:49+5:30
आतापर्यंत दोघांचा मृत्यू; रामनगर पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा
गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुर्याटोला रेल्वे चौकी येथील देवानंद सितकू मेश्राम (५२) यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळणाऱ्या आरोपी किशोर श्रीराम शेंडे (४२) याला अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले.
१४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री जावयाने सासरा, पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली होती. या आगीत देवानंद सितकू मेश्राम (५२) यांचा मृत्यू झाला तर आरती किशोर शेंडे (३०) व जय किशोर शेंडे (४) हे ९० टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. १५ फेब्रुवारीला उपचारादरम्यान जयचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७, ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तिरोडा डी. बी. पथकातील पोलिसांच्या मदतीने आरोपी किशोर शेंडे (रा. भिवापूर, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया) याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार राजेश भुरे, चव्हाण, कपिल नागपुरे, मनोज सपाटे, अख्तर शेख यांनी केली.
पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय
किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करायचा. या मारहाणीला त्रस्त होऊन पत्नी माहेरी आली. माहेरी आल्यावरही त्याने भांडण केले होते. यातून हे कृत्य केले आहे, असे समीर देवानंद मेश्राम (२८, रा. सुर्याटोला) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दार उघडताच उगारली माचीसची काडी
आरोपी किशोर शेंडे (रा. भिवापूर) याने दारावर व घरावर पेट्रोल टाकले. पेट्रोल टाकल्यावर त्याने दार ठोठावले. यावेळी कोण आहे म्हणून दार उघडण्यासाठी आरती शेंडे गेली असता दार उघडताच त्याने पेट्रोल टाकलेल्या जागेवर माचीसची काडी टाकून जाळले.
आरोपीला २० पर्यंत पोलिस कोठडी
आरोपी किशोर शेंडे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.