मानेगावातील बांगड्या आंतरराष्ट्रीय बाजारात
By admin | Published: February 20, 2017 12:47 AM2017-02-20T00:47:24+5:302017-02-20T00:47:24+5:30
वनोपज असलेल्या लाखेपासून सुंदर बांगड्या तयार करुन त्यांना गोंदिया, नागपूर, मुंबई, दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात पाठविण्याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही महत्त्वाचे स्थान मिळेल ...
४८ महिलांना दिले प्रशिक्षण : वनव्यवस्थापन समितीचे आर्थिक उत्थान
नरेश रहिले गोंदिया
वनोपज असलेल्या लाखेपासून सुंदर बांगड्या तयार करुन त्यांना गोंदिया, नागपूर, मुंबई, दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात पाठविण्याबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही महत्त्वाचे स्थान मिळेल यासाठी वनव्यवस्थापन समितीच्या ४८ महिला व सहा पुरुष अशा ५६ लोकांना बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या बांगड्या देशभरासह आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्याची जबाबदारी लाख प्रोसेसिंग इंडस्ट्रीज बालाघाट यांनी घेतली आहे.
मानेगाव येथील जंगलाचे संरक्षण करुन ग्रामवन घोषित झालेल्या या गावातील लोकांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने मानेगावातील जंगलाचे संरक्षण करुन वन्यजीवांची संख्या वाढविण्यास मदत केली. परिणामी पर्यटकांसाठी काळवीट व चितळ यांचे दर्शन होईल असे पर्यटनस्थळ निर्माण केले. जंगलाचे संवर्धन करताना पोटापाण्याचा प्रश्न पडतो म्हणून वनाधिकारी डी.बी. पवार, क्षेत्र सहायक एल.एस. भूते, वनरक्षक राठोड यांनी बालाघाट येथील लाखापासून बांगडी तयार करणाऱ्या प्रशिक्षकाला आमंत्रित करुन या समितीच्या सदस्यांना बांगळी तयार करण्याचे दहा दिवसाचे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणातून ४८ महिला व सहा पुरुषांना लाखापासून सुबक बांगड्याा तयार करण्याची कला उमगली. त्यांनी सुबक बांगड्या तयार केल्या. या समितीच्या सदस्यांना बांगड्या तयार करण्याचे साहित्य पुरविण्याचे काम व त्यांनी तयार केलेल्या बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारी लाख प्रोसेसिंग इंडस्ट्रीज बालाघाटने घेतली आहे.
अत्यल्प खर्चात सुबक बांगड्या तयार करुन या स्वयंरोजगारातून आर्थिक समृद्धी साधण्याचा चंग वनव्यवस्थापन समिती व महिला बचत गटाच्या सदस्यांनी बांधला आहे.
मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या अनेक टिप्स
मानेगावातील वनपर्यटन स्थळाला आज (दि.१९) मुख्य वनसंरक्षक के.टी. रेड्डी यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी वन व्यवस्थापन समितीने सुरू केलेल्या स्वयंरोजगाराची पाहणी केली. महिलांनी तयार केलेल्या या बांगळ्यांसाठी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे. त्यांनी आपला आर्थिक विकास सहजरित्या कसा करता येईल तसेच मानेगावातील जंगलातून ४० लाखाचा बांबू निघणार असल्याने याचा फायदा गावकऱ्यांना कसा होईल यासंदर्भात माहिती दिली. यावेळी लाख बांगळी प्रशिक्षक सी.एल. पारधी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, यु.टी. बिसेन, वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी. पवार, क्षेत्रसहायक एल.एस.भूते व वनरक्षक राठोडसह नागरिक उपस्थित होते.
चार गावात तयार होत आहेत लाखेच्या बांगड्या
वनउपज असलेल्या लाखापासून आमगाव तालुक्याच्या धावडीटोला, कुंभारटोली, मानेगाव व सोदलागोंदी या चार ठिकाणी बांगडया तयार करण्यात येत आहेत. या स्वयंरोजगारातून प्रत्येक सदस्याला दररोजची मजूरी ३०० ते ४०० रुपये पडेल इतका या व्यवसायाला विकसित करण्यासाठी वनविभागाचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहे.
वनांचे संरक्षण करताना लाखापासून बांगड्या तयार होतात हे माहित नव्हते. परंतु वनाधिकाऱ्यांच्या मदतीने घेतलेल्या प्रशिक्षणातून लाखेपासून आम्ही सुबक बांगड्या तयार करीत आहोत. या रोजगारातून आर्थिक प्रगती साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अल्का हरिणखेडे, मानेगाव