ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी गोंदिया जिल्ह्यातील ‘मंडई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:48 AM2018-01-11T11:48:58+5:302018-01-11T11:49:31+5:30
ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे. या मंडईत विविध वस्तुंच्या खरेदीचे आकर्षण, आप्तेष्टांच्या भेटींची असणारी ओढ, पाहुण्यांचा पाहुणचार व सरबराई आणि मनोरंजनासह विविध नाटके, दंडार, पोवाडे व कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन असायचे. वर्तमान स्थितीत यापैकी बऱ्याच गोष्टी मंडईतून हद्दपार होताना दिसत आहेत. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचे आकर्षण कमी झाले असले तरी समाज प्रबोधन लोप पावत केवळ आणि केवळ मनोरंजनच शिल्लक राहिल्याने ही बाब खटकणारी आहे. त्यातही अनेक ठिकाणी ‘डान्स हंगामा’ च्या नावावर रात्री चालणाऱ्या अश्लील नृत्यांनी मंडईतील पावित्र्यच धोक्यात आणले आहे.
मंडई हा पूर्व विदर्भात जोपासला जाणारा एक उत्सव आहे. पारंपारिक पद्धतीने हा उत्सव ग्रामीण भागात विशेषत: दिवाळी पर्व संपल्यानंतर सुरू होतो. या काळात गावागावात मंडईची धूम असते. दिवाळीच्या तिसºया दिवसापासून म्हणजे भाऊबिजेपासून झाडीपट्टीत गावोगावी मंडईचा जत्रोत्सव असतो. तो कार्तिकपर्यत चालतो. मंडई म्हणजे नजीकच्या गावातील अनेक दंडारींचा जलसा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मंडई म्हणजे एक प्रकारचा बाजार. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात बाजार भरत नाही. गावातच सौंदर्य प्रसाधनांसह इतर साहित्य उपलब्ध होण्याची ही सुविधा असते. मंडईच्या काळात शेतकऱ्यांचे पिक निघलेले असते. सासुरवाशीणींना वस्तुंची खरेदी करुन द्यावी. याशिवाय मंडईच्या निमित्ताने घरात आलेल्या पाहुण्यांना पाहुणचाराशिवाय मनोरंजनासाठी गावात नाटक, तमाशा, लावणी यासारख्या लोककलांची मेजवानी दिली जाते. मंडईच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी, रोजगारासाठी गेलेली मंडळी घरी स्वगावी परत येतात. त्यांच्या भेटीगाठी हा उद्देश असतो. या काळात गुलाबी थंडी असते. घरी आलेल्या गोतावळ्याची पूर्णत: सुविधा होत नाही. यासाठी त्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली जाते असाही एक समज आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्षभर शेतात राबतात. पीक उत्पादन हाती आलेल्या पैशातून वर्षभराचा शिण घालवायचा जावई-माहेरवाशिणी, मुलगा-सासुरवाशिणी व नातवंडांना मेजवानी द्यायची, हा सुद्धा मंडईचा एक उद्देश असतो. सासरी कामांनी आलेल्या सासुरवाशिणी भाऊबिजनिमित्ताने माहेरी मंडईत आलेल्या असतात. ही मंडई, मंडईनिमित्ताने माहेरची सरबराई व मनोरंजनात्मक कार्यक्रमातून त्या सासुरवासाचे सारे क्लेश विसरतात आणि नव्या उभारीने पूर्ववत कामाचा गाडा उपसण्यास पूर्वी सारख्याच सज्ज होतात.
मंडईत तंट्याचे आकर्षण
मंडईत प्रामुख्याने दंडार दाखविली जाते. यात दाखविण्यात येणारा तंट्या खास आकर्षण असते. हल्ली मंडईचा ट्रॅक बदलला आहे. दंडारीचेही स्वरुप बदलले आहे. पूर्वी हातापायांना धारदार तलवारी टोचलेला रक्तबंबाळ तंट्या पाहून लहान मुलांची भीतीने अक्षरश: बोबडी वळायची. खोडकर मुलांना घरातली आई वर्षभर या तंट्याचीच भिती दाखवायची व त्याने केलेली खोड मोडून काढत त्यावर चांगले संस्कार घालण्याचा प्रयत्न होत असे. त्यामुळे त्याकाळी मुलांना संस्कारक्षम बनविण्याचे एक उत्तम साधन म्हणूनही याकडे पाहिले जात असे.
दंडारी नामशेष होण्याच्या मार्गावर
काळाच्या ओघात दंडारी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पुरातन कलाकृती जोपासणारी मंडळी आता उरली नाही. आजच्या पिढीला याचे आकर्षण नाही. पूर्वी पोवाडा, गणगवळण, लाकडी टाहारा या वस्तू दंडारीत दिसायच्या. तुणतुण्या वाजायच्या. ढोलक वादक आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर थाप द्यायचा. भारुड, पोवाडा, गणगवळण हे सुमधूर संगीत मोहीत करणारे होते. विविध वेशभूषा करुन दंडार सादरकर्ते नाचून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवायचे. पुरुष मंडळी स्त्रीचे वेश व वस्त्र परिधान करुन लोकांना आकर्षित करायचे. सर्कशीतील विदूषकाप्रमाणे दोन व्यक्ती लाकडी साहित्य घेवून विविध आवाज काढायचे. परंतु हे कलावंत आता कमी होऊ लागली आहेत.