मुंडीकोटा पोलीस चौक सतत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 12:49 AM2016-05-26T00:49:08+5:302016-05-26T00:49:08+5:30

मुंडीकोटा येथील पोलीस चौक नियमित सुरू ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. याची दखल पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेवून सदर चौकी सुरू केली होती.

Mandi Kotota police chowk was stopped continuously | मुंडीकोटा पोलीस चौक सतत बंदच

मुंडीकोटा पोलीस चौक सतत बंदच

Next

आंदोलनाची तयारी : डोंगरे यांचे पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
काचेवानी : मुंडीकोटा येथील पोलीस चौक नियमित सुरू ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. याची दखल पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेवून सदर चौकी सुरू केली होती. मात्र पुन्हा सदर चौकी बंद करण्यात आली आहे. ही पोलीस चौकी चोवीस तास सुरू ठेवण्यात यावी, यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी व परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
तिरोड्यापासून मुंडीकोटा १२ किमी अंतरावर आहे. तिरोडा पोलीस ठाणे गाठण्यासाठी नागरिकांना त्रास होतो. आठ महिन्यापूर्वी कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी तिरोड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी देविदास इलमकर यांना मुंडीकोटा पोलीस चौकी चोवीस तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत इलमकर यांनी नागरिकांना बोलावून नारळ फोडून विधिवत पोलीस चौकी सुरू केली. मात्र ही चौकी जेमतेम आठ दिवसच सुरू ठेवण्यात आली.
निवेदनानुसार, कित्येक महिन्यांपासून मुंडीकोटा पोलीस चौकी अपवाद वगळता चोवीस तासांमधून आठ तासही सुरू राहत नसून शोभेची वास्तू बणून आहे. याबाबत डोंगरे यांनी पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण समोर केले जात असल्याचे सांगण्यात आले.
या परिसरात पोलीस चौकी नसल्याने अवैध धंदे, दारूविक्री, रेती माफिया या प्रकारांत वाढ झाली आहे. अवैध धंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच पोलीस चौकी नियमित सुरू ठेवली जात नाही, असा आरोप जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी केला आहे. मुंडीकोटा पोलीस चौकी नियमित सुरू नसल्याने वादी-प्रतिवादी तिरोडा पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करतात. काहींना त्रास होत असल्याने तक्रार दाखल न करता अन्याय सहन करतात, असेही डोंगरे यांनी सांगितले.
मुंडीकोटा पोलीस चौकी निष्क्रीय झालेली आहे. यात रेती माफिया, दारू विक्रेते व इतर गैरकामांना प्रोत्साहन देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची साठगाठ असावी, अशी शंकासुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. मुंडीकोटा पोलीस चौकी चोवीस तास सुरू ठेवण्यात यावी अन्यथा पूर्णत: बंद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मुंडीकोटा हे गाव भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर आहे. येथील पोलीस चौकीला एकूण १७ गावे जुडलेली आहेत. गोंदिया-तिरोडा-तुमसर-भंडारा हा मुख्य बसमार्ग व रेल्वे मार्ग जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात व चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तिरोडा पोलीस ठाणे लांब अंतरावर असल्याने अवैध धंद्यांना उत आला आहे. याकरिता मुंडीकोटा पोलीस चौकी नियमित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही तर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्यासह सरपंच निर्मला भांडारकर, सरपंच मंदा कुंभरे (नवेगाव), केशव भोयर, बाळकृष्ण कनोजे, यशवंत वळतकर, प्रकाश शेंडे, सफी शेख, रफीक शेख, राजू शेंडे, संजय वहिले, बांते, सिद्धार्थ मेश्राम, श्रावण कोसरे, चंद्रकुमार परतेती, विक्रम भोयर, संजय खोब्रागडे, सागर कुकडे, शोभाराम साठवणे आदी नागरिकांन दिला.

Web Title: Mandi Kotota police chowk was stopped continuously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.