चंद्रिकापुरे पिता पुत्राचा शिंदेसेनेत प्रवेश, चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 21:43 IST2025-02-13T21:42:54+5:302025-02-13T21:43:20+5:30
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते...

चंद्रिकापुरे पिता पुत्राचा शिंदेसेनेत प्रवेश, चर्चांना पूर्णविराम
गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी गुरुवारी (दि.१३) मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिंदेसेनेत प्रवेशाने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पुर्ण विराम लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. यादरम्यान पुत्र सुगत चंद्रिकापुरेसह प्रहार संघटनेत प्रवेश केला होता. सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहारच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र प्रहारमध्ये त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यामुळे ते लवकरच शिंदेसेनेत पुत्रासह प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला अखेर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर पुर्णविराम लागला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम -
माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर अर्जुनी मोरगाव येथे लवकरच शेतकरी
मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे माजी आ. चंद्रिकापुरे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.