मनोहरभाईंनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:51 PM2018-02-09T23:51:38+5:302018-02-09T23:55:10+5:30
स्व. मनोहरभाई पटेल यांनी ७० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपातंर झाले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. यासाठी त्यांना संघर्ष देखील करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल यांनी ७० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपातंर झाले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. यासाठी त्यांना संघर्ष देखील करावा लागला. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणाची प्रज्वलित केलेली ज्योत अविरत ठेवण्यासाठी त्यांचे सपुत्र प्रफुल्ल पटेल प्रयत्नरत आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थामुळेच या भागातील लोकजीवन बदलले असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शुक्रवारी (दि.९) येथे केले.
स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वण पदक वितरण कार्यक्रम येथील डी. बी.सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.अबु आझमी, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, नरेंद्र वर्मा, उत्कर्ष पारेख, नरेश बन्संल, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, उमादेवी अग्रवाल, वर्षा पटेल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी.आ. दिलीप बन्सोड, हरिहरभाई पटेल, माजी. आ. राजेंद्र जैन, अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, दीपम पटेल उपस्थित होते. अखिलेश यादव म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी शैक्षणिक संस्थासह मोठे प्रकल्प आणून या भागाचा कायापालट केला. सरकारने या सर्व प्रकल्प आणि योजनांचा योग्य उपयोग केल्यास शेतकºयांचे भाग्य बदलण्यास मदत होईल. प्रफुल्ल पटेल यांच्याशी आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत. ते संबंध यापुढे देखील कायम राहतील. सत्तेवर असताना सर्वच जण कार्यक्रमांना बोलवितात मात्र सत्तेवर नसताना देखील प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला. यामुळे आधीचे कौटुंबिक संबंध अधिक घट्ट झाले आहेत. खा.पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची बीजे पेरली. या भागातील शेतकरी व जनता समृध्द व्हावी, यासाठी त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प आणले. दोन्ही जिल्ह्यातील शैक्षणिक मागसलेपण दूर व्हावे, यासाठी त्यांनी एकाच दिवशी २२ हायस्कूल सुरू केले. ते खºया अर्थाने विकासाचे महामेरू होते. त्यांचे कार्य अविरतपणे सुरू राहावे यासाठी आपण प्रयत्न आहोत. लोक व समाजासाठी काम करणारा नेहमीच मोठा होत असतो. यापुढे या भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द राहू अशी ग्वाही पटेल यांनी दिली. अबु आझमी म्हणाले, शिक्षणा शिवाय दुसरे कोणतेही मोठे कार्य नाही. ही बाब ७० वर्षांपूर्वी मनोहरभाई पटेल यांनी ओळखून या भागात शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.त्यामुळे ते दूरदृष्टीचे नेते होते. सध्या देशात विचित्र घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे लोकांनी विचलित न होता सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शेरो शायरी केली. नफरत की दिवारे गिरा दो, देश गद्दारो को बता दो की धर्ती अबंर हमारा है, हा शेर सादर करुन एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन आ. राजेंद्र जैन यांनी केले.
अखिलेश यांना आठवले बालपण
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे शुक्रवारी (दि.९) गोंदिया येथे आले होते. या दरम्यान त्यांनी गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांना त्यांच्या बालपणाची आठवण झाली. मी देखील मिल्ट्री स्कूलमध्ये होतो तेव्हा शाळेला सुट्टया केव्हा लागणार हे कँलेडर पाहून रोज दिवस मोजत होतो असे सांगत त्यांनी त्यांच्या बालपणातील आठवणीना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदकाने गौरव
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुनम रोहणकर, ओजल उरकुडकर, मोनिका नखाते, हर्षा बालवानी, नुतन मनगटे, अश्विनी रोकडे, सिया ठाकुर, ओंकार चोपकर, रिचा बिसेन, वैष्णवी शेंडे, दिशा अग्रवाल, दिपा पंजवानी, तोशाली भोयर, नुपूर खंडेलवाल, संयुक्ता मृत्युंजय सिंग, प्रिती देशपांडे, विशाल मन्सूर अहमद या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रगतीशिल शेतकरी भालचंद्र ठाकूर, तुकाराम भाजीपाले, अमृत मदनकर, विनोद गायधने आणि डॉ. देवाशिष चटर्जी, धनंजय दलाल यांचाही सत्कार करण्यात आला.
संदेसे आते है...ने बांधला समा
प्रसिध्द गायक सोनू निगम याचे मंचावर आगमन होतातच उपस्थितांच्या आनंदाला पारा उरला नाही. यानंतर सोनू निगमने नमस्ते गोंदिया म्हणून उपस्थितांशी संवाद साधला. संदेसे आते है, हे गीत सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यानंतर दिवाना तेरा.. ये मर्जी मेरी, अभी मुझमे मे कही ते, हर घडी बदल रही है जिंदगी आदी गीते सादर केली. तर कल हो ना या गाण्याने समारोप केला. सोनू निगम यांने सादर केलेल्या गीतांनी समा बांधल्याचे चित्र होते.
यादव यांनी दिले शेतकऱ्याला निमंत्रण
मनोहरभाई पटेल जयंतीचे औचित्य साधून नटवरलाल माणकिलाल दलाल महाविद्यालयाच्या प्रागंणात कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. गोंदियातील प्रतिष्ठित शेतकरी भालचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर यांच्या शेतातील स्ट्राबेरी, केळी, अनार, बोरासह अनेक फळांचा आकार पाहुण अखिलेश यादव यांना आश्चर्य वाटले. सेंद्रीय शेतातील पीक, फळे बघून सर्वच पाहूणे भारावून गेले होते. ठाकूर यांना बोर व स्ट्राबेरीसह इतर फळ आम्हाला द्या असे सांगत ठाकूर यांना शेतीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी उत्तरप्रदेशाला येण्याचे निमंत्रण दिले.
राजू श्रीवास्तवच्या चुटकुल्यांनी श्रोते लोटपोट
प्रसिध्द हास्य कलावंत राजू श्रीवास्तव यांनी यावेळी स्वच्छ भारत अभियान व नोटबंदीवर सादर केलेल्या छोट्या छोट्या चुटकल्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित श्रोते चांगलेच लोटपोट झाले होते. त्यांनी अमिताभ बच्चन, राजकुमार, दिलीपकुमार यांची मिमिक्री सादर केली. तसेच मध्ये माँ बम्लेश्वरी माता की जय असा जयघोष करीत उपस्थितांमध्ये जोश भरला.