टाकाऊ अन्नापासून खतनिर्मिती; गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:34 PM2019-06-01T12:34:24+5:302019-06-01T12:36:56+5:30

रेल्वे स्थानकावरील कॅटीन आणि रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात दररोज टाकाऊ अन्न गोळा होते. या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प गोंदिया रेल्वे स्थानकावर राबविण्यात येणार आहे.

Manufacturing of pesticide from waste food; Projects at Gondia Railway Station | टाकाऊ अन्नापासून खतनिर्मिती; गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रकल्प

टाकाऊ अन्नापासून खतनिर्मिती; गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेच्या चमूने केले सर्वेक्षण जागेची केली पाहणी, उत्पन्नात होणार वाढ

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे स्थानकावरील कॅटीन आणि रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात दररोज टाकाऊ अन्न गोळा होते. या अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प गोंदिया रेल्वे स्थानकावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर विभागाच्या रेल्वे चमूने गुरूवारी गोंदिया रेल्वे स्थानकाला भेट देवून पाहणी केली. काही आवश्यक सूचना केल्याची माहिती आहे.
वेस्ट इन टू बेस्ट हे धोरण जवळपास बहुतेक विभागाने आत्मसात केले आहे. यात आता रेल्वे विभाग सुध्दा मागे राहिलेला नाही. रेल्वे विभागाचा खर्च कमी करुन उत्पन्नात कशी वाढ करता येईल. यादृष्टीने गोंदिया रेल्वे स्थानक प्रशासनातर्फे विविध प्रयोग केले जात आहे. तीन महिन्यापूर्वी गोंदिया रेल्वे स्थानक प्रशासनाने विजेच्या खर्चाची बचत करण्यासाठी सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. यामुळे विजेच्या खर्चात बचत होवून अतिरिक्त विजेची विक्री करुन त्यातून उत्पन्न मिळविले जात आहे.त्यानंतर आता गोंदिया रेल्वे स्थानकावर दररोज गोळा होणार केरकचरा आणि टाकाऊ अन्नाची योग्य विल्वेवाट लावून त्यापासून सुध्दा उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर रेल्वे गाड्या धावतात. तसेच २० हजारावर प्रवाशी दररोज या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर दररोज १ ट्रक विविध प्रकारच केरकचरा गोळा होतो. तर दररोज १०० किलो टाकाऊ अन्न गोळा होते. सध्या या सर्व केरकचऱ्याची विल्हेवाट ही नगर परिषदेच्या माध्यमातून लावली जात आहे.यासाठी रेल्वे विभागाने नगर परिषदेशी करार केला आहे. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात दररोज गोळा होणाºया टाकाऊ अन्नापासून सेंद्रिय खत निर्मिती शक्य आहे.त्यासाठीच नागपूर येथील रेल्वे विभागाच्या तज्ज्ञांच्या चमूने गुरुवारी गोंदिया रेल्वे स्थानकाला भेट देवून पाहणी केली. तसेच रेल्वे स्थानकावर दररोज किती टन केरकचरा गोळा होतो. त्यात टाकाऊ अन्नाचे प्रमाण किती आहे या सर्व गोष्टींची माहिती घेतली. केवळ टाकाऊ अन्नापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार असून त्यात प्लॉस्टीक व इतर कचरा असणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.

दुहेरी होणार लाभ
टाकाऊ अन्नापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी किमान १०० किलो टाकाऊ अन्न रोज गोळा होणे आवश्यक आहे. यात झाडांचा पालपाचोळा टाकून सेंद्रिय खत निर्मिती शक्य आहे. विशेष म्हणजे यामुळे या रेल्वे स्थानकावर दररोज गोळा होणाऱ्या टाकाऊ अन्नाची योग्य विल्हेवाट लावता येईल. तसेच रेल्वे स्वच्छ सुंदर ठेवण्यास मदत होवून सेंद्रिय खताच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रक्कमुळे रेल्वेचे उत्पन्न वाढविणे शक्य होणार आहे.

मालधक्क्याजवळील जागेची पाहणी
गोंदिया रेल्वे स्थानकावर सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने रेल्वे स्टेशनच्या मालधक्का परिसरातील जागेची पाहणी नागपूर येथील चमूने केली. ही चमू यासंपूर्ण गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणार असून त्यानंतर त्यांच्या सूचना आणि मंजुरीनंतर पुढील कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आहे.

रेल्वे स्थानकावर दररोज गोळा होणाºया टाकाऊ अन्नापासून सेंद्रिय खत निर्मिती शक्य आहे. त्यासाठीच गुरूवारी येथील चमूने गोंदिया रेल्वे स्थानकाला भेट देवून या प्रकल्पाच्या दृष्टीने सर्व गोष्टींची चाचपणी केली.
- मुकेश उबनारे
वरिष्ठ आरोग्य अधिकारी, गोंदिया रेल्वे स्थानक.

Web Title: Manufacturing of pesticide from waste food; Projects at Gondia Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे