पीक पाहणी ॲपमध्ये अनेक अडथळे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:34 AM2021-09-15T04:34:03+5:302021-09-15T04:34:03+5:30
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲंड्राईट मोबाईल उपलब्ध नाही ज्या ...
शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲंड्राईट मोबाईल उपलब्ध नाही ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही अशा शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीचे झाले आहे. पिकाची नोंद करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर दिली आहे. जे शेतकरी पीक पाहणी ॲपमध्ये पिकाची नोंद करणार नाही. त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील. परिणामी त्या शेतकऱ्यांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. सध्याचा काळ हा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने फारच अडचणीचा आहे. खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांजवळील होता नव्हता पैसा खर्च झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांजवळ पैसे नाही. ॲंड्राईट मोबाईल फोन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. त्यामुळे मोबाईल खरेदी कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही शेतकऱ्याची वास्तवता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहेत. ते शेतकरी पिकाची नोंदणी करताना दिसून येत आहेत. परंतु पिकाची नोंदणी करताना कधी कधी हे ॲप ओपन होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी सहायक, तलाठी शेतकऱ्यांच्या मदतीला असले तरीही मोबाईल ॲप चालविण्यासाठी नेटवर्क मिळत नसेल तर काय उपयोग? यामुळे पीक पाहणी योजना कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांसाठी हा ॲप त्रास देणारा ठरला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.