आथिलकर यांच्यासह अनेक सरपंच देणार राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:51+5:302021-02-13T04:27:51+5:30
बिरसी-फाटा : घरकुलच्या प्रपत्र ‘ड’मध्ये सुटलेल्या लाभार्थ्यांचा यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुंडीकोटाचे सरपंच कमलेश आथिलकर यांनी ८ ...
बिरसी-फाटा : घरकुलच्या प्रपत्र ‘ड’मध्ये सुटलेल्या लाभार्थ्यांचा यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुंडीकोटाचे सरपंच कमलेश आथिलकर यांनी ८ फेब्रुवारीपासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे. मात्र, त्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहेत. अशात आथा आथिलकर यांच्यासह अनेक सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे आता हे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा, ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत, त्यांना ५० हजारांचा पहिला धनादेश द्यावा, रेतीची सोय व्हावी व प्रपत्र ‘ब’ मध्ये सुटलेल्या लाभार्थ्यांचा समावेश यादी व्हावा, ग्रामपंचायतने दिलेली यादी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेनुसार गावागावांतील नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश व्हावा आदी मागण्यांसाठी सरपंच संघटनेच्या वतीने मुंडीकोटाचे सरपंच आथिलकर यांनी पंचायत समितीसमोर ८ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणाची दखल पंचायत समिती स्तरावरून घेतली असली, तरी खंडविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर आमदार व पदाधिकाऱ्यांनीही याकडे पाठ फिरविली आहे. अशात जनतेच्या रास्त मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नाही, अशा पवित्रा आथिलकर यांनी घेतला आहे. आता आथिलकर यांच्यासोबत अन्य सरपंच खंडविकास अधिकाऱ्यांना राजीनामा देणार असल्याचे आथिलकर यांनी सांगितले आहे.