अनेक शाळा अघोषित बंद
By admin | Published: July 23, 2014 12:04 AM2014-07-23T00:04:38+5:302014-07-23T00:04:38+5:30
संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा अघोषित बंद होेत्या. सकाळपाळीत असलेल्या शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी आले होते.
अनेक शाळा पाण्याखाली : शहर झाले जलमय
नरेश रहिले - गोंदिया
संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा अघोषित बंद होेत्या. सकाळपाळीत असलेल्या शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी आले होते. मात्र पूर परिस्थिीती पाहून अनेक शाळांनी सुटी दिली. जिल्ह्यातील बहुतांश शाळा मंगळवारी बंद होत्या.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारच्या रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले. सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी येत असल्याने जिल्ह्यातील अनेक घरांची हालत खस्ता झाली आहे. काही घरांना जबर धक्का बसला आहे. तर काही घरे अंशत: पडली आहेत.
रात्री पासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळ पर्यंत नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. परंतु पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे जिकडे तिकडे पुरपरिस्थीती होती. आठही तालुक्यातील अनेक शाळा बंद होत्या. ज्या शाळा सकाळ पाळीच्या होत्या. त्या ठिकाणी निम्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परंतु पूर परिस्थिती लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एका तासिकेनंतर सुट्टी देण्यात आली. ग्रामीण भागात असलेल्या शाळांमध्ये दूरदूरच्या विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यांना नाले पार करून जावे लागत असल्याने अश्या पावसात विद्यार्थी पूरात अडकण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थीच शाळेत जात नाही. ग्रामीण भागातील सर्व शाळा अघोषित बंद होत्या.
शहरातीलही शाळांमध्ये विद्यार्थी नव्हते. काही ठिकाणी शिक्षकच होते. अनेक ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक शहराच्या ठिकाणावरून ये- जा करीत असल्याने पावसामुळे त्यांना शाळेत जाता आले नाही. आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील शिक्षकांना किडंगीपार येथील पूलावरून जाता आले नाही. तसेच जवरी येथील शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी मार्गच नव्हता. किंडगीपार येथील जवरी नाल्यावरऊन पाच फूट व शिवणी नाल्यावरून तीन फूट पाणी वाहात असल्याने शिक्षकांना शाळेत जाता आले नाही.
गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या काही शाया उघडल्या. मात्र शाळेत शिक्षक नाही व विद्यार्थी नाही अशी स्थिती शहरातील शाळांमध्ये होती. संततधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. थंड वाऱ्यासह घरात येणाऱ्या पाण्यात आपल्या घरातील साहित्य आंथरून, पांघरून वाया जाऊ नये यासाठी साहित्य वाचविण्यासाठी नागरिकांचा आटापिटा सुरू होता. शाळकरी मुलेही आपल्या घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याच्या प्रयत्नात होते. शहरातील शाळांमध्ये शिक्षक नाही, विद्यार्थी नाही ही परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांनी शाळा बंद करून आपापले घर गाठले.
देवरी तालुक्यातील काही शाळा उघड्या होत्या. मात्र शाळेत विद्यार्थीच आले नसल्याने शिक्षकांना दिवसभर गप्पा मारत राहावे लागले. देवरीचे तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, विद्युत वितरण कार्यालय व ग्रामपंचायत या शासकीय कार्यालयात पाणी गळत असल्यामुळे येथील लोकांना गैरसोय झाली. देवरी येथील नाल्याला पूर असल्यामुळे नाल्याची थोप तहसील कार्यालयापर्यंत आली होती. जिकडे तिकडे पूर परिस्थती असल्यामुळे ग्रामीण भागाचा संपर्क तालुक्याशी तुटला होता.