अनेक गाड्यांच्या थांब्यांपासून स्थानके वंचित
By Admin | Published: February 26, 2016 02:01 AM2016-02-26T02:01:06+5:302016-02-26T02:01:06+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर नाही.
सावत्र व्यवहार : मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगकडे दुर्लक्षच
देवानंद शहारे गोंदिया
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर नाही. अनेक दिवसांची प्रवाशांची तशी मागणी असतानाही रेल्वे प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा त्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसून येत नाही.
तिरोडा, भंडारा रोड, गोंदिया, आमगाव, सालेकसा, वडसा, सौंदड, तुमसर आदी स्थानकांना स्टॉपेजची प्रतीक्षा आहे. प्रवासी, व्यापारी लोकप्रतिनिधींकडे जावून निवेदने देतात. परंतु रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील विशेषकरून विदर्भातील लोकप्रतिनिधींची ऐकूण घेत नसल्यासारखी स्थिती असल्याचे दिसून येते. तिरोडा येथे विदर्भ एक्सप्रेसचा थांबा, गोंदियात पूरी-दुरंतो आदी गाड्यांचा थांबा मिळणे गरजेचे आहे. पूजा स्पेशल व समर स्पेशल गाड्यांमध्ये गोंदियाचा थांबाच दिसून येत नाही. बिलासपूर झोनमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारा स्थानक आहे. (नागपूर स्टेशन मध्य रेल्वेचा आहे) असे असतानाही गोंदिया जिल्ह्यात मोडणारी स्थानके थांब्यांपासून व विकासापासून वंचित आहेत.
दपूम रेल्वेचे मुख्यालय बिलासपूर (छ.ग) मध्ये आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली तसेच चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील काही भाग या अंतर्गत मोडते. नवीन गाड्यांचा शुभारंभ असो, स्टॉपेज देणे असो, प्रवासी गाड्यांचे टर्मिनस असो, तिसरी लाईन घालणे असो किंवा इतर विकास कामे असो, छत्तीसगडला प्राधान्य दिले जाते व विदर्भातील जिल्ह्यांशी सावत्र व्यवहार केला जातो. छत्तीसगडच्या बिलासपूरवरून दररोज २१ जोडी गाड्या सुटतात, रायपूर व दुर्गवरून २३ जोडी गाड्या सुटतात. मात्र गोंदियातून केवळ मुख्य मार्गावर मागील वर्षी बरोनी एक्सप्रेस ही एकच गाडी सुरू करण्यात आली, तेही राजकीय दबावाने. २० वर्षापासून बनलेल्या या झोनने गोंदिया, भंडारा, ईतवारी, चांदाफोर्टवरून प्रवासी गाडी सुरू करण्याचे प्रयत्न केले नसल्याचे रेल्वे प्रवाशी संघठनेचे म्हणणे आहे.
दुसरीकडे मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगची समस्या आवासून उभी आहे. अशा मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडून जीवितहानी व वित्तहानी होते. गोंदिया-चांदाफोर्ट व गोंदिया-बालाघाट मार्गावर मोठ्या प्रमाणात मानवरहीत रेल्वे क्रॉसिंग आहेत. अनेकदा अपघात घडल्याचे वृत्त येते. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्यापही ही समस्या सोडविली नाही. सध्याच्या अर्थसंकल्पात मानवरहीत रेल्वे क्रासिंगवर रेडिओव्हेवजच्या सहाय्याने सूचना देण्यासाठी आयआयटी कानपूरसोबत करार करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मात्र त्यामुळे मानवरहीत रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमची संपुष्ठात येणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया गोंदियावासीय देत आहेत. मनुष्यबळालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.