अनेक मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:35 PM2018-05-29T21:35:58+5:302018-05-29T21:35:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सोमवारी (दि.२८) होती. यात सर्व जनतेला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण काही वंचित मतदार मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गोरेगाव तालुक्याच्या ग्राम कमरगाव येथील ओमकारलाल गुणवंतराव नागपुरे व सर्व वंचित मतदारांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
वंचित मतदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मतदान केंद्र ६३/१३ मध्ये मतदान यंत्र सकाळी ७ वाजता सुरू झाले. परंतु त्यानंतर लगेच सकाळी ८.३० ते १० वाजतापर्यंत व नंतर पुन्हा दुपारी १.४५ ते ३.१५ वाजतापर्यंत मशिनमध्ये बिघाड आल्यामुळे मतदान बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्व जनतेला भीषण उष्णता व त्रास सहन करावा लागला. भर उन्हामध्ये मतदारांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मतदानापासून वंचित ठेवण्यामध्ये पोलिंग अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिद्ध होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
जनता आपल्या अधिकाराचे पालन करण्यासाठी गुन्हा मतदान करण्यासाठी आले असता दुपारी ३.१५ वाजता मशिन सुरू झाली. मात्र पोलिंग अधिकाऱ्याने ३ वाजताच मतदान केंद्र बंद करून टाकले होते. शासनाने दिलेल्या मतदान क्रमांक पावतीवर मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंतची होती. याचा लेखी पुरावा असूनही निवडणूक निर्णय अधिकाºयाने मतदारांना कोणतीही सूचना न देता सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत स्वत:च्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या दबावात येवून मतदारांचा मतदानाचा हक्क हिसकावून टाकला.
तसेच कमरगावापासून मोहाडी गाव ३ किमी अंतरावर असून एकाच मतदार संघात आहे. तेथे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत घेण्यात आला. मात्र कमरगावात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. याला जबाबदार कोण, असा सवाल वंचित मतदारांनी केला आहे.
सदर प्रकरणाची रीतसर चौकशी करून दबंगशाही करणाºया पोलिंग अधिकाºयाला पदमुक्त करण्यात यावे व वंचित मतदारांना न्याय द्यावे, अशी मागणी ओमकारलाल नागपुरे, चंद्रकुमार अटरे, देवराम जैतवार, शालीकराम रहांगडाले, मीरा रहांगडाले, दुगराम जैतवार, द्वारका जैतवार, लोकश्वर जैतवार, अशोक नागपुरे, गंगा नागपुरे, इंदिरा नागपुरे, रजनी नागपुरे, गुलाब बघेले, पार्वता टेंभरे, अनुसया नागपुरे, ओंकारलाल नागपुरे, विमला नागपुरे, स्वाती नागपुरे, राजेश चौरावार, खेमराज पारधी आदी अनेक मतदानापासून वंचित मतदारांनी केली आहे.