पाणीपुरवठ्याची अनेक कामे अपूर्ण; हर घर जल नळयोजना ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:46 PM2024-11-26T16:46:37+5:302024-11-26T16:47:46+5:30
Gondia : विभागाकडून मात्र योजनेचा निव्वळ गाजावाजा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करून योजना सुरू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अनेक योजना अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात दोन कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत. निधी मिळत नसल्याने या कंत्राटदारांनीही कामे अर्धवट ठेवली आहेत. दरम्यान, अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
१५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल या योजनेची घोषणा केली. २०२४पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन देण्यात आले. जलजीवन योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरिता पंतप्रधानांनी देशातील सर्वच सरपंचांना पत्र पाठविले. योजनेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमागे ५५ लिटर पाणी देता येईल, असे नियोजन या योजनेत करावयाचे होते.
लोकसंख्येनुसार तेवढ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करावयाचे होते. जिल्ह्यात जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेचा मोठा गाजावाजा केला. मात्र, अनेक ठिकाणी या योजनेच्या कामातील अनियमिता पुढे आली. या विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकऱ्यांना अजूनही 'हर घर नल से जल' योजनेचे पाणी मिळाले नाही.
निधी मिळत नसल्याने कामे ठप्प
केवळ तिरोडा तालुक्यातच नव्हे, संपूर्ण जिल्ह्यात निधीअभावी जलजीवनची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत कंत्राटदार काहीच बोलत नाहीत. निधी मिळत नसल्याने सध्या ही कामे अपूर्ण असल्याची माहिती आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे. तिरोडा तालुक्यात किती कोटी रकमेची कामे मंजूर आहेत. किती कामे पूर्ण झाली आहेत. किती कामे अपूर्ण आहेत. याची कनिष्ठ अभियंता यांना विचारणा करण्यासाठी त्यांच्या मोबाइ- लवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.