जिल्ह्यासाठी घातक ठरली ‘मार्च एंडींग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:43+5:302021-04-03T04:25:43+5:30
गोंदिया : मागील वर्षी दिवाळी नंतर नियंत्रणात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. मागील वर्षी मार्च ...
गोंदिया : मागील वर्षी दिवाळी नंतर नियंत्रणात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाने कहर केला व तेव्हापासून वर्षभर हेच सत्र सुरू राहिले. त्यानुसार यंदाचा मार्च महिना सुद्धा कोरोनाचा काळाचाच ठरला. जिल्ह्यात मार्च महिन्यातील शेवटचा आठवडा धोक्याचा ठरला व रूग्ण संख्या तब्बल शेकड्यात गेली. यामुळेच जिल्ह्यासाठी ‘मार्च एंडींग’ घातक ठरल्याचे दिसत आहे.
देशात मागील वर्षी सन २०२० मध्ये मार्च महिन्यातच कोरोना आपले पाय पसरू लागल्याने लॉकडाऊन करावा लागला होता. एकंदर मार्च महिना देशासाठी कधीही न विसरता येणारा काळा महिना ठरल्याचे म्हणता येईल. आर्थिक वर्षाची सांगता होणार हा महिना मात्र कोरोनाची सुरूवात करणारा महिना ठरला आहे. त्यानंतर मात्र हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन सुरळीत होत होते. मात्र तीच परिस्थिती पुन्हा एकदा उलटून आली असून कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा आता आपला रंग दाखवू लागला असून हे सर्व मागील वर्षाप्रमाणे यंदाही मार्च महिन्यातच घडत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात नियंत्रणात असलेला कोरोना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उद्रेक करू लागला आहे. यामुळेच जिल्ह्यासाठी ‘मार्च एंडींग’ घातक ठरल्याचे दिसत आहे.
---------------------------
२७ मार्चपासून आकडेवारी शेकड्यात
जिल्ह्यात मार्च महिन्यातील २७ तारखेपासून आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. २७ तारखेला जिल्ह्यात १०० रूग्ण निघाले होते. त्यानंतर हे सत्र सुरूच झाले असून २ एप्रिल रोजी तब्बल २०९ रूग्ण निघाले आहेत. यामुळेच जिल्ह्यासाठी मार्च महिन्याचा शेवट धोकादायक ठरत असल्याचे दिसत आहे.
.............
मार्च महिन्यात १४६८ रुग्णांची नोंद
मागील तीन महिन्यात कोरोनाचा आलेख खालावला होता. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाचा ग्राफ पुन्हा वाढला. मार्च महिन्यात तब्बल १४६८ रुग्णांची नोंद झाली तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
.......