बाजार समिती झाली ‘आंबटगोड’
By admin | Published: April 20, 2016 01:51 AM2016-04-20T01:51:51+5:302016-04-20T01:51:51+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बाजार समितीत चिंचेची आवक होत असून ...
मोठ्या प्रमाणात चिंचेची आवक : दक्षिण भारतात होत आहे निर्यात
गोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात बाजार समितीत चिंचेची आवक होत असून सध्या चार ते सात हजार रूपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या या चिंचेमुळे शेतकऱ्यांना पुरक उत्पन्न मिळत असून चिंचेने भरलेली येथील बाजार समिती सध्या ‘आंबटगोड’ झाली आहे.
चिंच म्हणताच तिच्या आंबटगोड चवीमुळे तोंडाला पाणी सुटते. चिंच ही रानमेव्यातील एक प्रकार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिंचेचे उत्पादन घेतले जाते. धानाचा हा जिल्हा असला तरिही चिंचही मोठ्या प्रमाणात निघत असल्यामुळे जिल्ह्याची चिंचेसाठीही ख्याती आहे. येथील चिंचेला दक्षिण भारतासह इतर काही राज्यात मागणी आहे. येथील चिंचेची बाजारपेठ बघता लगतच्या राज्यांतूनही चिंच येथील बाजार समितीत विक्र ीसाठी येते.
एरवी धानाने भरून असलेल्या येथील बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंच दिसून येत आहे. शेडमध्ये ठिकठिकाणी चिंचेचे फड लागून ठेवलेले बघावयास मिळतात. काट्यांवरही चिंचेचीच मोजणी होत असल्याचे बाजार समितीत दिसत आहे. चिंचेची एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने एकंदर बाजार समिती चिंचमय झाली असून या आंबटगोड चिंचेमुळे बाजार समितीही ‘आंबटगोड’ झाली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली चिंच येथील व्यापारी स्टॉक करून ठेवतात. त्यानंतर ही चिंच दक्षिण भारतात पाठविली जाते. तिकडे या चिंचेला चांगली मागणी आहे. तिकडे चिंचेचा जास्त वापर होत असल्याने येथून व्यापारी तिकडे चिंच पाठवितात. (शहर प्रतिनिधी)