धान खरेदीने मार्केटिंग फेडरेशन काेमात ! कारवाईची प्रक्रिया सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 05:00 AM2022-07-09T05:00:00+5:302022-07-09T05:00:02+5:30
आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथके याची चौकशी करण्यासाठी तडकाफडकी रवाना करण्यात आली. या पथकांना ४५ संशयास्पद धान खरेदी केंद्रांची यादी देण्यात आली असून, या केंद्रांनी एकाच दिवशी १० हजार क्विंटल धान खरेदी कशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी (दि. ७) ऑनलाईन पोर्टल सुरू केले. पण पोर्टल सुरू केल्यानंतर एकाच दिवशी धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. तर एकाच दिवसात १ लाख क्विंटल खरेदी करणे शक्य असताना १०७ धान खरेदी केंद्रांवर ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झालीच कशी, असा प्रश्न जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसमोर निर्माण झाला असून, फेडरेशनची यंत्रणा कोमात गेल्याचे चित्र आहे.
बरेच शेतकरी शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील सर्व १०७ धान खरेदी केंद्रांवर धान घेऊन गेले. मात्र, धान खरेदी केंद्र संचालकांनी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना परतवून लावले. आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथके याची चौकशी करण्यासाठी तडकाफडकी रवाना करण्यात आली. या पथकांना ४५ संशयास्पद धान खरेदी केंद्रांची यादी देण्यात आली असून, या केंद्रांनी एकाच दिवशी १० हजार क्विंटल धान खरेदी कशी केली.
तसेच खरेदी केलेले धान नेमके शेतकऱ्यांचेच होते की कुणाचे, धान खरेदी केंद्रांवर जमा करण्यात आलेले सातबारा बोगस तर नाहीत ना, धान खरेदी केंद्रांची नेमकी क्षमता किती आणि त्यांनी किती धान खरेदी केले, याची सविस्तर माहिती पथकातील अधिकारी घेणार आहेत.
तसेच शनिवारी (दि. ९) सकाळीच हा सर्व अहवाल जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्याकडे सोपविला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही बाब फार गांभीर्याने घेतली असून, त्या स्वत:ही काही केंद्रांना भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान अहवाल सादर केल्यानंतर किती धान खरेदी केंद्रावर कारवाई केली जाते हे महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
एकाच दिवशी १० हजार शेतकऱ्यांकडून धान खरेदी
- गुरुवारी एकाच दिवशी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रांवर १० हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्याची नोंद ऑनलाईन पोर्टलवर झाली आहे. तर यात व्यापाऱ्यांची नेमकी संख्या किती, याचा शोध आता घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
फेडरेशनही म्हणते एकाच दिवशी एवढी धान खरेदी अशक्य
- शासकीय धान खरेदी केंद्रांवर गुरुवारी एकाच दिवशी ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याचे दाखविण्यात आले. पण यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी एकाच दिवशी एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याचे सांगितले.
चार तालुके रडारावर
- धान खरेदी दरम्यान सर्वाधिक घोळ हा सालेकसा, आमगाव, गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांतील एकूण ४५ धान खरेदी केंद्रांवर झाल्याची बाब पुढे आली आहे. या केंद्रांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून, त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर या केंद्र संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मर्यादेपेक्षा अधिक खरेदी
- सालेकसा, गोंदिया आणि आमगाव तालुक्यांतील काही केंद्रांवर त्यांना ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांनी १५ ते २० हजार क्विंटल अधिक धान खरेदी केल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या केंद्रांची आता संपूर्ण जंत्री शोधली जाणार आहे.