डांबरी रस्त्यांना मुरूमाचा लेप
By admin | Published: August 14, 2014 11:48 PM2014-08-14T23:48:00+5:302014-08-14T23:48:00+5:30
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कुणापासून लपलेली नाही. नगर पालिकेने याविषयी तोंडावर कुलूप व डोळ््यावर पट्टी बांधून घेतली आहे. आता मात्र स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर
रस्ता दुरूस्ती : गोंदिया नगर पालिकेला आली उशिरा जाग
गोंदिया : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कुणापासून लपलेली नाही. नगर पालिकेने याविषयी तोंडावर कुलूप व डोळ््यावर पट्टी बांधून घेतली आहे. आता मात्र स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पालिकेने शहरातील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले असून डांबरी रस्त्यांवर मुरूमाचा लेप चढविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील रस्त्यांची झालेली दुर्गती लक्षात घेता मध्यंतरी रस्ता दुरूस्तीची झडच लागली होती. या रस्ता दुरूस्तीला एवढा जोम आला होती की, सिमेंटच्या रस्त्यांवर डांबरी रस्ते तयार करण्यात आले. शहरातले काही मुख्य रस्त्यांचा यात उद्धार झाला व तोही काही दिवसांपूरताच राहीला. महिना होत नाही तो या रस्त्यांवरचे डांबरीकरण उखडून गेल्याचे चित्र असून या रस्त्यांना दुरूस्तीची गरज निर्माण झाली आहे. शिवाय शहरातील अंतर्गत रस्त्यांचे हाल तर सोडूनच द्या. हे सर्व चित्र मात्र नगर पालिकेच्या नजरेत येत नव्हते. पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी तोंड व डोळे बंद करून ठेवले होते व त्याचा त्रास मात्र शहरवासी भोगत आहेत.
आता स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर मात्र पालिकेला जाग आली असून रस्ता दुरूस्तीची कामे सुरू झाली आहेत. येथे रस्ता दुरूस्ती म्हणजे रस्त्यांवरील खड्यांवर कोठे गिट्टी तर कोठे मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या या कारभारावरून मात्र शहरवासीयांना हसायला येत असून व तेवढाच राग सुद्धा येत आहे.
(शहर प्रतिनिधी)