लग्न जुळू देत नाही..! दोन गटांत हाणामारी, ९ गंभीर जखमी
By नरेश रहिले | Published: November 1, 2023 05:02 PM2023-11-01T17:02:44+5:302023-11-01T17:05:13+5:30
महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल
गोंदिया : लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. आता मुला-मुलींचे लग्न जुळवण्याचे काम सुरू आहे. परंतु, एक मुलगा लग्न जोडण्यासाठी आटापिटा करीत असताना त्याची चुकीची माहिती समाजात काही लोक पसरवत आहेत. मुलीकडील मंडळींना मुलाविषयी चुकीची माहिती दिल्याने लग्न जमले नाही. परिणामी चुकीची माहिती देणाऱ्यांच्या विरोधात मुलाकडील मंडळीनी दंड थोपटले. या घटनेत ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले. यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला (गोवारीटोला) येथील योगेश रेखलाल रत्नाकर (२३) याला पाहण्यासाठी मुलीकडील मंडळी आले होते. परंतु तो मॅटेडोरचा ड्रायव्हर असल्याचे सांगितल्यामुळे लग्न जमले नाही. त्यामुळे आरोपी योगेश रेखलाल रत्नाकर (२३), रेखलाल चंदनलाल रत्नाकर (५०), चंदनलाल फिरतू रत्नाकर(६०), महेश चंदनलाल रत्नाकर (४०), निर्मला रेखलाल रत्नाकर (४२) व भूमेश चंदनलाल रत्नाकर (३५, सर्व रा. कुणबीटोला) यांनी काठीने, विटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत लक्ष्मीनारायण चिंतामण रत्नाकर (३४), शांता चिंतामण रत्नाकर (४८), आकाश रूपलाल रत्नाकर (२२), चिंतामण भय्यालाल रत्नाकर (५५) हे जखमी झाले. एका गटाला मारहाण झाल्याने दुसऱ्या गटातील आरोपी लक्ष्मीनारायण चिंतामण रत्नाकर (३४), चिंतामण भय्यालाल रत्नाकर (५५), आकाश रूपलाल रत्नाकर (२२), भय्यालाल फिरतू रत्नाकर (६५), शांता चिंतामण रत्नाकर (४८) यांनीही मारहाण केली. योगेश रेखलाल रत्नाकर (२३), रेखलाल चंदनलाल रत्नाकर (५०), चंदनलाल फिरतू रत्नाकर (६०), निर्मला रेखलाल रत्नाकर (४२) यांनी विटा, काठी व थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी दोन्ही गटांवर भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ सहकलम ३७ (१), (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.