विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जन्मठेप
By admin | Published: April 20, 2016 01:50 AM2016-04-20T01:50:49+5:302016-04-20T01:50:49+5:30
विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गोंदिया : विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणी मंगळवारी जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी केली.
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुळमुळी चौकी विचारपूर येथील विवाहित महिला कमलाबाई रोमनलाल नागपुरे (२४) या हिचा घरगुती कलहातून खून झाला होता. या संदर्भात पती रोमनलाल बेनिराम नागपुरे (३०) व सासरा बेनिराम राधेलाल नागपुरे (६०) या दोघांनीच तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सन २००८ मध्ये कमलाबाईशी आरोपी रोमनलाल याचे लग्न झाले होते. लग्नानंतर पती पत्नीचा वाद झाल्याने कमलाबाई माहेरी गेली होती. चार महिने माहेरी राहिल्यानंतर राजनांदगावच्या कौटुंबिक न्यायालयातून तिला आपल्या घरी आणण्याचे ठरविले होते. तिला घरी आणल्यानंतर काही दिवसांनतर पुन्हा वाद सुरू झाला. २४ डिसेंबर २०१३ च्या रात्री ११ वाजतादरम्यान झालेल्या वादात बापलेकांनी गळा आवळून तिचा खून केला. तपास तत्कालीन ठाणेदार संदीप रणदिवे यांनी केला. १२ साक्षीदार तपासल्यावर या प्रकरणातील आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील अॅड.कैलाश खंडेलवाल यांनी युक्तीवाद केला. सीएमएस सेलचे राजकुमार कराडे यांनी पैरवी केली.
मृतक व आरोपींच्या नखांवर रक्त
पोलिसांनी या घटनेतील मृतक व आरोपी यांचे नख जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. मृताच्या चेहऱ्यावर नखाच्या जखमा व आरोपींच्या चेहऱ्यावरही जखमा आढळल्या होत्या. त्यांचे नख जप्त करून तपासणीसाठी पाठविल्यावर आरोपींच्या नखांवर मृतकाचे रक्त तर मृतकाच्या नखांवर आरोपींचे रक्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.