गोंदिया रेल्वेस्थानकात प्रत्येक बोगीतील प्रवाशांना पाणी पुरवणारा ‘मटका कोला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:01 AM2019-05-28T11:01:46+5:302019-05-28T11:04:19+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील पन्नास वर्षांपासून मटका कोला च्या माध्यमातून प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्याचे काम एका समितीमार्फत सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळा लागताच पूर्वी बसस्थानक व शहरातील मुख्य चौकात स्वंयसेवी संस्था पाणपोई सुरू करीत होते. मात्र अलीकडे हे चित्र दिसेनासे झाले आहे. समाजात माणुसकीचा झरा आटत असताना मात्र हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील पन्नास वर्षांपासून मटका कोला च्या माध्यमातून प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्याचे काम एका समितीमार्फत सुरू आहे. त्यांच्या या सेवा कार्यात मागील पन्नास वर्षांपासून कधीच खंड पडला नसून त्यांच्या या कार्याला नाबाद पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
धानाचा जिल्हा अशी वेगळी ओळख जपणाऱ्या गोंदिया जिल्ह्याचे आणखी वैशिष्ट आहे. ते म्हणजे मटका कोला (पाणपोई) हे होय. हावडा-मुंबई मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर २० हजारावर प्रवाशी दररोज ये-जा करतात. उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची बरेचदा गैरसोय होते. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गोंदिया येथील किराणा तेल व्यापारी संघाने श्री रणछोडदासजी महाराज यांच्या प्रेरणेने नगर नागरिक सेवा समितीची १९६४ मध्ये स्थापना केली. त्यानंतर रेल्वे स्थानकावर मटका कोला ही सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी मागीतली. तत्कालीन रेल्वे स्टेशन अधीक्षक के.पी.ननजुंदन यांनी परवानगी देत सहकार्य केले. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तृष्णा तृप्ती करण्यासाठी मटका कोला हा उपक्रम सुरू करण्यात आला. रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी येताच प्रत्येक डब्ब्यापर्यंत पोहचून प्रवाशांना थंड पाणी देण्याचे काम हे या समितीचे सदस्य करतात. विशेष म्हणजे मागील पन्नास वर्षांपासून या सेवेत कधीच खंड पडला नाही. त्यामुळेच उन्हाळ्यात तीन महिने रेल्वे स्थानकावर थंड पाणी मिळते.अशा प्रकारची थंड पाण्याची सुविधा मिळणारे हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एकमेव आहे.नगर नागरिक सेवा समितीने सुरू केलेल्या सेवा कार्याला समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मागील पन्नास वर्षांपासून अविरत पुढे नेत आहेत. त्यामुळे या सेवा कार्यात समाजातील अनेक तरुण सुध्दा जुळत आहे. ते देखील दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रेल्वे स्थानकावर पोहचून प्रवाशांना थंड पाणी देण्याची सेवा करतात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाºया प्रवाशांना सुध्दा कुठे पाणी मिळाले नाही तरी गोंदिया रेल्वे स्थानकावर निश्चितच थंड पाणी मिळेल असे सांगतात. ऐवढी या सेवा कार्याची महती झाली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी नगर नागरिक सेवा समितीचे भगीरथ अग्रवाल, रामप्रसाद अग्रवाल, पुरुषोत्तम पलन, हरगुरूदास ठकरानी, सुरेशभाई पलन,लेडूमलजी भोजवानी, कुमारभाई पलन, रामचंद अग्रवाल, सतीश अग्रवाल, जस्सूभाई सोलंकी,घनश्याम पुरोहित, लक्ष्मीचंद रोचवानी यांनी पुढाकार घेतला.
मजुरांना रोजगार
गोंदिया रेल्वे स्थानकावर उन्हाळ्यात तीन महिने मटका कोला ही थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाडीच्या डब्ब्यापर्यंत जावून प्रवाशांना थंड पाणी त्यांच्याकडील बॉटलमध्ये भरुन दिले जाते. यासाठी समितीने २० ते २५ मजुर सुध्दा लावले आहे. यामुळे तीन महिने या मजुरांना सुध्दा रोजगार मिळतो.
कामठीवरुन मागविले जातात रांजण
रेल्वे प्रवाशांना चौवीस थंड पाण्याची सुविधा देण्यासाठी नगर नागरिक सेवा समितीने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून दरवर्षी खास मातीचे रांजण मागविते. या रांजणतील पाणी थंड राहत असल्याने प्रवाशांची सुध्दा तृष्णा तृप्ती होत आहे.