मातृ वंदन योजना ठरणार माता व अपत्यासाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:25+5:302021-09-03T04:29:25+5:30
कपिल केकत गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असल्याने आजही जन्माला येणारी मुले कुपोषित असतात. गर्भवती मातांना सकस ...
कपिल केकत
गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असल्याने आजही जन्माला येणारी मुले कुपोषित असतात. गर्भवती मातांना सकस आहार मिळत नसल्याचे हे परिणाम असल्याने पुढे त्याचा माता व बाळांवर दुष्परिणाम जाणवतात. अशात माता गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. परिणामी माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.
महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असणार आहे. राज्यात १ जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये दिले जाणार असून लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे.
--------------------------------
तीन टप्प्यात मिळणार पैसे
योजनेंतर्गत पहिला हप्ता एक हजार रुपयांचा असून हा मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता दोन हजार रुपयांचा असून किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर व तिसरा हप्ता दोन हजार रुपयांचा असून प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाईल.
पहिला टप्पा- १०००
दुसरा टप्पा- २०००
तिसरा टप्पा- २०००
-------------------------
पात्रतेचे निकष काय?
फक्त मानव विकास योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच शासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, योजनेचा लाभ कोणत्याही गटातील तसेच दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील महिला घेऊ शकते.
---------------------------
लाभासाठी कोठे करायचा संपर्क
ग्रामीण क्षेत्रात एएनएममार्फत पात्र लाभार्थींचा विहित नमुना प्रपत्र १ (अ)चा अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे, नगरपालिका क्षेत्रात एएनएममार्फत परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.
----------------------------
महिलांनी लाभ घ्यावा
माता व बाळांसाठी अत्यंत लाभदायी अशी ही मातृ वंदन योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेला आरोग्य व औषधांसाठी पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. वेदप्रकाश चौरागडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी