विमानांचे अपहरण टाळण्यासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 10:08 PM2017-08-06T22:08:05+5:302017-08-06T22:12:52+5:30
काही वर्षांपूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काही वर्षांपूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व देशातील एखाद्या विमानतळावरून विमानाचे अपहरण झाले तर कोणत्या प्रकारच्या उपययोजना कराव्या, याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी बिरसी येथील भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या विमानतळावर करण्यात आले.
यावेळी उपाययोजनांची रंगीत तालीम घेवून बिरसी विमानतळ समितीची सभा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. विमान कशाप्रकारे संपर्कात येवू शकते. अचानक त्या विमानाचे अपहरण कशाप्रकारे होते व अपहरणाचे कोडवर्ड याबाबतची माहिती या प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
यावेळी धावपट्टीवर ३ रूग्णवाहिका, एक अग्निशमन वाहन, श्वानपथक, पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. कंट्रोलरूम येथून पोलीस अधीक्षकांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश बिनतारी संदेशातून प्रात्यक्षिक करणाºयांना दिले. यावेळी कंट्रोल रूममधून प्रात्यक्षिकांची पाहणी उपस्थितांनी केली.
जिल्हाधिकारी काळे यांनी बिरसी विमानतळ समितीची सभा घेतली. सभेला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, विमानतळचे संचालक सचिन खंगार, प्रविण गडपाल, अजय वर्मा, विनयकुमार ताम्रकार, संदीप पिंपळापुरे, देवेंद्र गौर, के.एस. राव, सोनवणे, ओ.एस. पशीने, रिंचेन डोलमा, विजय अहिरे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, बिरसी विमानतळ येथे सुध्दा २४ तास कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे. विमान अपहरणासारखी घटना या विमानतळावर होणार नाही, यादृष्टीने दक्ष असले पाहिजे. विविध भाषा जाणणारे व्यक्ती या समितीमध्ये असावे. विमानतळ प्राधिकरणाचा स्वतंत्र प्रसारमाध्यम अधिकारी नेमण्यात यावा, अशी उपयुक्त सूचनाही त्यांनी यावेळी केली.
डॉ. भुजबळ म्हणाले, जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीस विभागाचे बंदोबस्त नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात असतो. पुरेसे पोलीस बळसुध्दा जिल्ह्यात नाही. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित पोलीस दल नसल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने अर्धसैनिक दलाच्या तुकड्यांमार्फत सुरक्षेची जबाबदारी दिल्यास उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खंगार यांनी विमानतळ सुरक्षेबाबतची व मागच्या सभेची माहिती दिली.