मेकॅनिकच्या मुलाने केली परिस्थितीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:32 PM2018-06-18T22:32:48+5:302018-06-18T22:33:07+5:30
परिस्थिती माणसाच्या प्रगतीत बाधा निर्माण करते. या संकटाने जो खचला तो संपला पण जो आत्मविश्वास बाळगून मनोधैर्य खचू देत नाही तो जिंकतोच.असाच दृढ विश्वास ठेवणाऱ्या येथील प्रितीश घनशाम मस्के या मोटारसायकल मेकॅनिकलच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : परिस्थिती माणसाच्या प्रगतीत बाधा निर्माण करते. या संकटाने जो खचला तो संपला पण जो आत्मविश्वास बाळगून मनोधैर्य खचू देत नाही तो जिंकतोच.असाच दृढ विश्वास ठेवणाऱ्या येथील प्रितीश घनशाम मस्के या मोटारसायकल मेकॅनिकलच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
प्रितीश हा स्थानिक जी.एम.बी. हायस्कुलचा विद्यार्थी आहे. झरपडा हे त्याचे मूळ गाव. सध्या तो अर्जुनीच्या बरडटोली येथे वास्तव्यास आहे. वडील कला शाखेचे पदवीधर असले तरी रोजगार नाही. म्हणून येथील एका पेट्रोल पंपसमोर छोटीशी टपरी लावून मोटारसायकल दुरुस्तीचे काम करतात. आई गृहिणी आहे. वडील सकाळी ८ वाजतापासून तर रात्रीच्या ८ वाजतापर्यंत आपल्या कामात मश्गुल असतात. प्रितीश जिथे वास्तव्यास आहे तिथे अजीबात शैक्षणिक वातावरण नाही. आई पण दिवसभर घरगुती कामकात व्यस्त असते. पण प्रितीश हा अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच हुशार आहे. त्याने कधीही शाळेच्या परीक्षेत पहिला क्रमांक सोडला नाही.
आई-वडील उच्च शिक्षित नसले तरी प्रितीश पेक्षा मोठी असलेली पल्लवी यवतमाळ येथे बीएससी कृषीचे शिक्षण घेत आहे. प्रितीशला गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयात प्रत्येकी ९९ गुण आहेत. मात्र इंग्रजी विषयात केवळ ७७ गुण आहेत. याचे शल्य त्याला बोचत आहे. त्याने या विषयाच्या पूनर्मुल्यांकनासाठी नागपूर शिक्षण मंडळ कार्यालयात अर्ज केला आहे. इंग्रजी हा त्याचा आवडीचा विषय असून शालेय सराव परीक्षेतही त्याला ९० पेक्षा अधिक गुण आहेत. २५ जून रोजी त्याला गुण पडताळणीसाठी बोर्डात बोलाविले आहे. या विषयात नक्कीच गुण वाढतील असा त्याला आत्मविश्वास आहे. वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे. मात्र वडिलांना वैद्यकीय शिक्षणाचा खर्च झेपणार नाही. परिस्थिती हलाखीची आहे म्हणून इंजिनिअरिंग (अभियांत्रीकी) क्षेत्राकडे वळावे असा निर्धार त्याने केला आहे. काहीही असले तरी मुलाने आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. त्याच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असा विश्वास वडील घनशाम मस्के यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला.