मेडीकल कॉलेज पडले आजारी
By admin | Published: March 5, 2017 12:13 AM2017-03-05T00:13:06+5:302017-03-05T00:13:06+5:30
गोंदियातील रूग्णांची सोय व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या मेहनतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय आले.
ना सलाईन, ना इंजेक्शन : अपघातातील रूग्णांना मरणयातना
गोंदिया : गोंदियातील रूग्णांची सोय व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या मेहनतीमुळे वैद्यकीय महाविद्यालय आले. रूग्णांना उत्तम सेवा मिळेल हा त्या मागचा हेतू होता. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मिळणाऱ्या सेवा पेक्षाही कितीतरी कमी प्रमाणात या मेडीकल कॉलेजमध्ये सेवा मिळत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १३ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची काळजी घेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून मेडीकल कॉलेज आणले. या मेडीकल कॉलेजमुळे रूग्णांचा त्रास कमी होणे अपेक्षीत होते. परंतु येथे उलटी गंगा वाहात आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सर्व अधिकार असताना येथे रूग्णांचा संथ गतीने का असेना उपचार होत होता. मात्र मेडीकल कॉलेज सुरू झाले तेव्हापासून रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
या मेडीकल कॉलेज मध्ये सद्यस्थितीत ना सलाईन, ना इंजेक्शन अशी अवस्था येथे आहे. अपघातातील जखमींची शस्त्रक्रिया पंधरा-पंधरा दिवस होत नाही. साहित्य उपलब्ध नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. येथील रूग्णांची सोनोग्राफी वेळेवर होत नाही. बाहेरून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. सिटीस्कॅन मशीन वर्षभरापासून बंद पडून आहे. डॉक्टर नसल्याने रूग्णांचा उपचार वेळेवर होत नाही.(तालुका प्रतिनिधी)
प्रत्येक रात्र ठरते काळ रात्र
गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रात्रीच्यावेळी डॉक्टर नसतात. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांचा उपचार होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचा मृत्यू होण्याची मालिकाच सुरू आहे. रात्रीच्यावेळी डॉक्टर नाही अशातच रूग्णांच्या नातेवाईकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी संबंधित डॉक्टरांना फोन करून उपचार करण्याची विनंती केल्यास त्या डॉक्टरांना वैद्यकीय अधिष्ठाता तुम्ही दुसऱ्यांच्या कामात ढवळा-ढवळ केलात असा ठपका ठेवतात. यामुळे इतरही डॉक्टर उपचार करण्यास मागे पुढे पाहत आहेत. एकीकडे उपचारासाठी डॉक्टर ठेवायचे नाही आणि एखाद्या डॉक्टरने मदत केल्यास त्यांच्यावर ठपका ठेवणे हे कितपत योग्य आहे.
काम न करताच उचलतात पगार
गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु येथे फक्त सहाच डॉक्टर कार्यरत आहेत. जे काम करतात त्यांना पगार दिला जात नाही, आणि जे डॉक्टर काम करीत नाही, वैद्यकीय महाविद्यालयात येत नाही त्यांचे पगार सहजरित्या काढले जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.