वैद्यकीय महाविद्यालयामुळे वाढणार रोजगाराच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:40 PM2019-08-13T21:40:08+5:302019-08-13T21:40:35+5:30
कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाला जगातील संभव उपचाराची सुविधा मिळणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाला जगातील संभव उपचाराची सुविधा मिळणार. एवढेच नव्हे तर भविष्यात युवांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम भागवतटोला (हिवरा) येथील १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर तलाव रस्ता खडीकरण तसेच ग्राम गोंडीटोला (कटंगीकला) येथील पाच लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, हिवरा, जब्बारटोला, कुडवा व कटंगी हा परिसर आमदार अग्रवाल यांच्या विकासकामांची साक्ष देणार असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, चमन बिसेन, धनलाल ठाकरे, धम्मानंद मेश्राम, प्रतिभा डोंगरवार, विनोद बिसेन, प्रिया मेश्राम, सरोज लिल्हारे, श्वेता वंजारी, संजय लिल्हारे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.