पाच महिन्यांपासून मेडिकलला औषधांचा पुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 09:45 PM2019-03-29T21:45:14+5:302019-03-29T21:45:47+5:30

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) मागील अनेक दिवसांपासून सीबीसी किट व केमिकल तसेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर मेडीकलाला पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून मागील पाच महिन्यांपासून औषधांचा पुरवठाच करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Medical has no medical supplies for five months | पाच महिन्यांपासून मेडिकलला औषधांचा पुरवठा नाही

पाच महिन्यांपासून मेडिकलला औषधांचा पुरवठा नाही

Next
ठळक मुद्देहापकिन्सला २२ लाख रुपये अदा : पाच वेळा स्मरणपत्र

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) मागील अनेक दिवसांपासून सीबीसी किट व केमिकल तसेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर मेडीकलाला पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून मागील पाच महिन्यांपासून औषधांचा पुरवठाच करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
मेडीकलमध्ये मागील महिनाभरापासून सीबीसी टी-३, टी-४, एसएच थायरॉईड व लिपीड प्रोफाईल, एलएफटी, केएफटी तसेच कावीळ आणि किडनी रोग तपासणी किटचा सुध्दा तुटवडा आहे. विशेष म्हणजे कोलेस्ट्रालची सुध्दा तपासणी केली जात नसल्याची माहिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात रक्त तपासणी प्रयोगशाळा असून सुध्दा आवश्यक केमिकलचा तुटवडा असल्याने विविध रक्त तपासणीवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत आहे. लोकमतने याची अधिक खोलात जावून माहिती घेतली असता ८६ प्रकारच्या औषधे आणि प्रयोगशाळेत आवश्यक साहित्यांचा मागील पाच महिन्यांपासून तुटवडा असल्याची बाब पुढे आली. शासनाच्या निर्णयानुसार मेडीकलला औषधांचा पुरवठा करण्याचे कंत्राट हापकिन्स या कंपनीला दिले आहे. त्यामुळे मेडीकलचे अधिष्ठातांनी आॅक्टोबर २०१८ ला ८६ औषधांची आणि प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी आॅर्डर दिले. शिवाय या औषधांसाठी २२ लाख रुपये सुध्दा हापकिन्स कंपनीला अदा केले. मात्र पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही मेडिकलला औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही.
परिणामी अधिष्ठात्यांनी सदर कंपनी आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांना सुध्दा पाच वेळा या संदर्भात स्मरणपत्र पाठविले. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाला लागणाऱ्या विविध किट्स उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पण त्याचा सुध्दा काहीच उपयोग झाला नाही.त्यामुळे मेडिकलमध्ये रक्त तपासणी किट्स व औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रुग्णांना खासगी पॅथॅलॉजी आणि औषधालयात जावून यांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ताकाची तहान पाण्यावर
शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना केवळ ५ हजार रुपयांपर्यंतची औषधे बाहेर खरेदी करण्याचे अधिकार दिले आहे.त्यामुळे औषधांचा तुडवडा निर्माण झाल्यास ती बाहेरुन खरेदी करण्याची सुध्दा अडचण आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात दररोज चारशेच्या वर रुग्णांची तपासणी केली जाते. त्यामुळे दररोज ५० ते ६० हजार रुपयांची औषधे लागतात. मात्र त्या तुलनेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंत औषध खरेदीचे अधिकारी ही फारच खेदाची बाब आहे. एकंदरीत हा प्रकार म्हणजे ताकाची तहान पाण्यावर भागविण्या सारखाच प्रकार आहे.
पंधरा दिवस पुरेल एवढाच औषधसाठा
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना नि:शुल्क आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचा सध्याचा कारभार पाहता सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांशी संपर्क साधला असता केवळ १५ दिवस पुरेल एवढाच औषधसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यावरुन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती लक्षात येते.
शासन कंपनीवर मेहरबान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पाच महिन्यांपूर्वी औषधे आणि साहित्याचा पुरवठा करण्यासाठी हॉपकिन्सकडे २२ लाख रुपये जमा केले. मात्र त्यांनी यानंतरही औषधांचा पुरवठा केला नाही. तर यासंदर्भात कंपनीला पाचवेळा स्मरणपत्रे सुध्दा देण्यात आली नाही. पण त्याचा सुध्दा काहीच परिणाम झाला नाही. मात्र यानंतरही शासनाकडून सदर कंपनीवर कुठलीच कारवाही करण्यात आली नसल्याने शासन या कंपनीवर मेहरबान असल्याचे चित्र आहे.
रुग्णांची फरफट
जिल्ह्यातील दूरवरुन रुग्ण मोठ्या अपेक्षेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र येथे आल्यानंतर रक्त तपासणी व विविध तपासणी होत नसल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा पूर्वीचे जिल्हा सामान्य रुग्णालयच बरे होते असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधांचा पुरवठा करण्यासाठी सदर कंपनीेकडे वांरवार पाठपुरावा करण्यात आला. पण यानंतरही औषधांचा पुरवठा झाला नाही. परिणामी बाहेरुन औषधे खरेदी करुन गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Medical has no medical supplies for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.