२३ वर्षांपासून बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी भोगत आहेत नशिबाचे भोग ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:36+5:302021-09-25T04:30:36+5:30
गोंदिया : गेल्या २३ वर्षांपासून बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ब जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम आणि संवेदनशील भागातील जनतेच्या आरोग्याची ...
गोंदिया : गेल्या २३ वर्षांपासून बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ब जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम आणि संवेदनशील भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा सक्षम आणि अविरत सांभाळत आहेत. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि वेतन वाढ या संविधानिक मूलभूत हक्कापासून वंचित आहे. शासनाने वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गात पदोन्नती देऊन सेवेत पडलेला खंड ग्राह्य धरण्याची गरज आहे.
महाराष्ट्र शासनाने भारतीय आयुर्वेद शास्त्राचा शिक्षण व संशोधनास प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्यातील आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, संवेदनशील भाग एकूण एक हजार आठशे अठ्ठावीस प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरते आरोग्य पथक निर्माण करून कार्यान्वित केले. यात बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ब यांची २३ वर्षांपूर्वी नियुक्ती केली आहे. तेव्हापासून ३६५६ या वैद्यकीय अधिकारी एकाच वेतन श्रेणीत एकाच पदावर एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी गट अ च्या खांद्याला खांदा लावून अविरत अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळून सेवा देत आहेत. वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गातील एकूण मंजूर पदाच्या २५ टक्के पदे ही बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ब यांना नामनिर्देशन पदोन्नती निवड पद्धतीने पदोन्नती देऊन भरले जावे, असे ३० ऑक्टोबर २०२० च्या शासन अधिसूचनेत नियमोलिखीत असताना या बाबीकडे शासन दुर्लक्ष करून बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना वेतन आणि पदोन्नतीच्या लाभापासून वंचित ठेवून अन्याय करीत आहे.
..........
शासनच करतोय दुजाभाव
वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्या कामकाजाचे स्वरूप एकसारखे असताना सेवाविषयक आणि वेतनविषयक लाभ फक्त वैद्यकीय अधिकारी गट अ यांनाच देत आले. तर वैद्यकीय अधिकारी गट ब यांना मूलभूत लाभापासून वंचित ठेवले जात आहे. शासनच भेद करून अन्याय करीत असेल तर न्यायाची मागणी कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे. वास्तविक समान काम, समान वेतन कायद्यानुसार बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब पदोन्नतीसाठी पात्र ठरतात. शेवटी नशिबाचे भोग केव्हा सुटणार, अशी चिंता बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांना सतावत आहे.
............
शासनाने घ्यावा धाेरणात्मक निर्णय
काही गट ब संवर्गातून वैद्यकीय अधिकारी एकाच पदावरून एकाच वेतन श्रेणीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना संविधानिक हक्कापासून वंचित ठेवून शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. ते अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत हालअपेष्ठा सहन करीत आहेत. कोरोनासारख्या वैश्विक महामारीची आव्हाने पेलण्यासाठी आयुर्वेद शास्त्र आणि मॉड मेडिसीन असे संयुक्त उपचार पद्धती ही काळाची गरज आहे. यासाठी शासनाने एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी गट अ च्या रिक्त जागांवर निवड प्रचलीत पद्धतीनुसार बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ब यांना शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्र नागरी संवर्गात पदोन्नती द्यावी.
- डॉ. अरुण कोळी, अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी महासंघ.