कारवाईच्या नावावर मेडिकल विक्रेत्यांना धरले जातेय वेठीस ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:49+5:302021-04-14T04:26:49+5:30
गोंदिया : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याच्या नावावर नगर परिषदेअंतर्गत मेडिकल विक्रेत्यांवर मागील दोन-तीन दिवसांपासून दंडात्मक कारवाई केली जात ...
गोंदिया : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याच्या नावावर नगर परिषदेअंतर्गत मेडिकल विक्रेत्यांवर मागील दोन-तीन दिवसांपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई करताना मेडिकल विक्रेत्यांचा दोष नसतानादेखील त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याने मेडिकल असोसिएशनने याचा विरोध करीत मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शहरातील सर्वच मेडिकल बंद ठेवली होती. ही बाब माजी आ. राजेंद्र जैन यांना कळताच त्यांनी जिल्हाधिकारी आणि न. प. मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला त्यानंतर मेडिकल विक्रेत्यांनी माघार घेत दुकाने उघडली.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५ .३० वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या भरारी पथकाने शहरातील विकास मेडिकल आणि शक्ती मेडिकलवर ग्राहकांनी मास्क न लावल्याने आणि फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मेडिकल विक्रेते कोरोना काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोवीस तास सेवा देत आहेत. ग्राहकांनी मास्क न लावल्यास आणि फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्यास यात मेडिकल संचालकांचा काय दोष आहे. मात्र, नगर परिषदेकडून यासाठी वांरवार मेडिकल विक्रेत्यांना वेठीस धरून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे शहरातील मेडिकल विक्रेत्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मंगळवारी न.प.ने दोन मेडिकलवर कारवाई केल्यानंतर मेडिकल असोसिएशनने या कारवाईचा विरोध करीत शहरातील सर्वच मेडिकल बंद केली. ही बाब माजी आ. राजेंद्र जैन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मेडिकल विक्रेते, न. प. मुख्याधिकारी करण चव्हाण, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच न. प.ने कारवाई करताना मेडिकल विक्रेत्यांना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासाठी वेठीस धरू नये, जे ग्राहक मास्क लावत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितले. तसेच यासंदर्भात जैन यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा केली. मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी न.प.कडून कारवाई करताना सर्व गोष्टींचा विचार करूनच कारवाई केली जाईल, असे सांगितले. माजी आ. जैन यांनी मेडिकल विक्रेत्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी माघार घेत दुकाने पुन्हा पूर्ववत सुरू केली.
....... कोट....
कोरोना काळात मेडिकल विक्रेते ग्राहकांना अविरतपणे सेवा देत आहेत, अशात त्यांना कारवाईच्या नावावर वेठीस धरणे योग्य नाही. जर ते औषधांचा काळाबाजार करीत असतील तर कारवाई करण्यात काहीच गैर नाही, पण विनाकारण त्यांना त्रास देऊन जीवनावश्यक सेवेत न.प.ने खंड निर्माण करू नये.
- राजेंद्र जैन, माजी आमदार.