विविध स्पर्धांनी महिला मेळाव्याची सांगता
By admin | Published: February 20, 2016 02:46 AM2016-02-20T02:46:14+5:302016-02-20T02:46:14+5:30
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम बिहिरीया येथे पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच अनिता मराठे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
इंदोरा बुज : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम बिहिरीया येथे पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच अनिता मराठे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. तिरोडा अदानी प्रकल्पाच्या समन्वयक जयश्री काळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या वेळी गावातील सुषमा कावळे, शीला टेंभरे, शिक्षिका कल्पना मेश्राम, सुनीता अंबुले, नीलिमा पानतावने, वंदना जमईवार, पुस्तकला परतेती, शीला चौरे, सरिता मेश्राम, बबिता मेश्राम, निशा मालाधारी, अंजिरा बोरकर आदी महिला उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन महिला मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनिता अंबुले यांनी उपस्थित महिला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकात महिला बचत गटाचे समन्वयक सुषमा कावळे यांनी महिलांच्या विविध समस्या मांडल्या. महिलांना समाजात कशा पद्धतीने कमी दर्जा दिला जातो, यावर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. शासनाच्या दरबारी महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी समाजात ते अपुरे आहे. याकडे महिलांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत शिक्षिका कल्पना मेश्राम यांनी व्यक्त केले.
दारुबंदी, व्यसनमुक्ती व महिलांचे मुख्य कर्तव्य यावर मार्गदर्शन करताना अदानी फाऊंडेशनच्या समन्वयक जयश्री काळे म्हणाल्या, महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले तरी महिला याचा फायदा घेत नाही. याचे नेमके कारण काय, यावर महिलांनीच विचार करायला हवे. महिला पुरुषाबरोबर काम करते, तेव्हा महिलांना पुरुषापेक्षा कमी लेखू नये. महिला जर गावात सक्षम झाल्या तर गाव प्रगतिपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीभू्रण हत्या, महिलांचा दर्जा, मुलगाच का हवा अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यंत्रयुगाच्या काळात मुली मुलापेक्षा कुठे ही कमी नाहीत तर एक पाऊल पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.
गावात दारुबंदी झाल्यामुळे गावात शांतता असल्याचे मत सरपंच अनिता मराठे यांनी व्यक्त केले. महिलांनी गावात प्रत्येक कामात पुढे येण्याचे आवाहन केले. या वेळी अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला महिलांसह पुरुषांचीसुद्धा उपस्थिती होती, हे विशेष.
विविध स्पर्धामध्ये गीत गायन, उखाने स्पर्धा, संगीत खुर्ची, वादविवाद स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. संचालन प्रेरक तुलसी शुक्ला यांनी केले. आभार प्रेरक रिना सोनेवाने यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पुसाम, ढबाले, पटले, वैद्य, मेश्राम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)