शेतकरी आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:31 AM2021-04-09T04:31:22+5:302021-04-09T04:31:22+5:30
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी येथील बायपास रस्ता प्रकरणासह विविध विषयावर आमदार, शेतकरी आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची दुसरी बैठक नुकतीच ...
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी येथील बायपास रस्ता प्रकरणासह विविध विषयावर आमदार, शेतकरी आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. केशोरी येथे पहिली बैठक एका आठवड्यापूर्वी झाली होती. त्यात आमदारांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागातील अधिकारी केशोरी या ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी बायपास रस्त्यांची मुख्य समस्या लक्षात घेऊन ज्या बायपास रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, असे शेतकरी आणि बांधकाम विभागातील अधिकारी यांची चर्चा प्रथमदर्शनी झालेली होती.
त्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील मुख्य बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जावेद यांना पुन्हा आमदारांनी चर्चेसाठी केशोरी येथे आमंत्रित केले. आपण पुन्हा शेतकऱ्यांसोबत चर्चा करू असे सांगितले. त्यामुळे पुन्हा बांधकाम विभागातील अधिकारी, आमदार आणि शेतकरी यांच्यामध्ये बायपास रस्त्याविषयी चर्चा झाली. यात रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला एक वाढीव दर मिळावा, असे मत व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी त्यांचे मत लक्षात घेऊन आपण जिल्हा समितीकडे आपली जी मागणी आहे, ती जिल्हा समितीमध्ये ठेवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अनुषंगाने सभेमध्ये उन्हाळी धान खरेदी करणे, याविषयी सुध्दा चर्चा करण्यात आली. धान उचल संबंधी सुध्दा आमदारांनी चर्चा केली. सदर बैठक केशोरीच्या ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते. याप्रसंगी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जावेद, माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, सरपंच नंदुकुमार गहाणे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश नाकाडे, माजी उपसरपंच हिरालाल शेंडे, अनेक शेतकरी व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.