पाच मिनिटांत आटोपली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:52 AM2017-10-28T00:52:05+5:302017-10-28T00:52:22+5:30

शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली.

Meeting up to five minutes | पाच मिनिटांत आटोपली सभा

पाच मिनिटांत आटोपली सभा

Next
ठळक मुद्देन.प. विशेष सर्वसाधारण सभा : पाचही विषयांना एकमताने मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली. या सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी पाचही विषयांना एकमताने मंजुरी दिली.
विरोधी पक्षातील सदस्यांनी उपाध्यक्षांच्या निवडीच्या विषयाला घेऊन उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती लावली आहे. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या आमसभेनंतर एकही सभा घेता आलेली नाही. दरम्यान न्यायालयाने सभेसाठी मंजुरी दिल्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शुक्रवारी (दि.२७) शहराशी निगडीत पाच महत्वपूर्ण विषयांना घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. या सभेमध्ये आरोग्य विभागातंर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता कीटकनाशक फवारणीकरिता कमी दर मंजूरी, नगर परिषद क्षेत्रातील भकट्या कुत्र्यांची नसबंदी, बेवारस डुकरांचा बंदोबस्त, बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी आणि नगररचना विभागांतर्गत नगर परिषदेच्या मालकीची जागा भूखंड क्रमांक ३०-३ व १२३ मधील क्षेत्र पोलीस स्टेशन रामनगर व कर्मचारी वसाहतीकरिता हस्तांतरीत करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार, शुक्रवारी १२.१५ वाजता नगराध्यक्षांच्या परवानगीने सभेची कारवाई सुरू झाली. मांडण्यात येणारे विषय शहरासाठी महत्वाचे असल्याने उपस्थित नगरसेवकांनी सर्वच विषयांना एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे पाच मिनिटांतच सभा आटोपली.
परिवर्तन आघाडीचे सदस्य नाराज
शुक्रवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता सभागृहात सुमारे ३० सदस्य हजर असल्याने व कोरमची पूर्तता झाल्याने सभेला सुरूवात करण्यात आली. सभेला उपस्थित सर्वच सदस्यांनी एकमताने विषयांना मंजुरी दिली. त्यामुळे सभा लवकर संपली. त्यानंतर गोंदिया परिवर्तन आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे, पंकज यादव, लोकेश यादव, ललिता यादव सचीन शेंडे यांच्यासह अन्य सदस्य सभागृहात पोहचले. मात्र तोपर्यंत सभा आटोपली असल्याचे पाहून आघाडीचे सदस्य नाराज झाले. किमान काही वेळ तरी त्यांनी वाट बघायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
नगर परिषदेत आयोजित सभेला घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त नगर परिषद कार्यालयात दिसून आला. विशेष म्हणजे, ठाणेदार दाभाडे स्वत: नगर परिषद कार्यालयात दिसले. शिवाय मोठ्या संख्येत पुरूष व महिला कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषदेत यापूर्वीही कित्येक सभा पार पडल्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पोलीस बंदोबस्त आढळला नाही.तगडा पोलिस बंदोबस्त पाहून नगर परिषद कर्मचारी देखील अवाक झाल्याचे चित्र होते.

Web Title: Meeting up to five minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.