धान भरडाईचा तिढा सोडविण्यासाठी बैठक आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:31 AM2021-05-11T04:31:10+5:302021-05-11T04:31:10+5:30
गोंदिया : गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान खरेदीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राईस मिलर्स आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने ...
गोंदिया : गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान खरेदीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राईस मिलर्स आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने पूर्व विदर्भातील एक कोटी क्विंटल धानाची भरडाई रखडली असल्याने हा धान गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी संकटात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता खा. प्रफुल्ल पटेल यांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खा. प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व अर्थ विभागाचे आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी ३ वाजता गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या विषयावर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीलासुद्धा खा. प्रफुल्ल पटेल, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.