मेहताखेडा नागपूर विभागात तिसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:23 PM2019-06-02T21:23:58+5:302019-06-02T21:28:05+5:30
तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.
मेहताखेडा गावची विशेषता म्हणजे थोर संतांच्या नावानेच प्रवेश होतो. गावात ठिकठिकाणी ‘स्त्रियांचा सन्मान हिच मेहताखेडाची शान’ ही म्हण लिहिलेली आहे. याद्वारे गावात स्त्रियांचा सन्मान केला जात असून गावातील सर्व कुटुंबांचे घर व मालमत्ता ही स्त्रियांच्या नावानेच आहे.
गावात प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. गावच्या बाजूला कंपनी असल्याने गावात रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भिंतीवर सुविचार आहेत. या गावात सर्व घरे मातीची असून ति ही स्वच्छ आहेत. तसेच गावात रोज सकाळ व सायंकाळ ६ वाजता ग्रामपंचायत अंतर्गत स्वयंचलित साऊंड संचद्वारे स्वच्छता विषयक प्रार्थना व चांगले विचार पोहोचविले जातात. यात आदर्श गाव वाटोडाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेही विचार याद्वारे ऐकविले जातात. यासोबतच गावात पूर्णत: दारुबंदी आहे. गावात हायमास्य लाईट आदिंची सोय असून डिजीटल बोर्ड लावले असून त्यात वेळ, दिनांक व तापमान दररोज दर्शविले जाते.
मेहताखेडाला आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मदत व मेहनत केली आहे. हे आदर्श गाव येथील ग्रामसेवक सुमेध बंसोड यांच्या नवनवीन कल्पना, सामाजिक भावना तसेच उच्चशिक्षीत सरपंच महाराजी जगत सलामे व उपसरपंच आसोबाई अरकरा, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी, कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, उपसिंग सर्पा व सर्व गावकºयांच्या सहकार्याने मोठे झाले आहे.
वॉटर एटीएमला पुलवामा शहिदांचे नाव
येथील गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची वॉटर एटीएमद्वारे सोय उपलब्ध करुन दिली आहे. शुद्ध पाण्याच्या दोन्ही वाटर एटीएमला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड व शहीद संजयसिंग दिक्षीत यांची नावे देवून देशाभिमान जागृत केला आहे.