सदस्यांना लागले आता सरपंचपदाचे डाेहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:45+5:302021-01-20T04:29:45+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, ...
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. सोमवारी मतमोजणी झाल्यानतंर ग्रामपंचायतीवरील सत्तेचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही जाहीर झालेले नाही. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावाचा प्रमुख गावकारभारी कोण, हे ठरणार आहे. त्यामुळे आता निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत.
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहे. यात १८९ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या, तर ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १८१ ग्रामपंचायतींच्या १,३८२ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे समर्थीत उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. मात्र, या पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या आणि निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपैकी कितीतरी जास्त आहे. त्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींवर निवडणुकीचे हे केवळ दावेच आहेत. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षविरहित लढविली जाते. गावपातळीवर निवडणूक लढविली जात असल्याने यात सर्वच पक्ष बाहेरून पाठिंबा देतात. त्यामुळे निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात कोणाची किती ग्रामपंचायतींवर सत्ता आली, हे चित्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होऊन प्रत्यक्षात सरपंच आरूढ झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आणि निवडून आलेल्या उमेदवारांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे.
.......
काेण होणार आपल्या गावाच प्रमुख कारभारी
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली; पण आता गावाचा सरपंच कोण होणार, याकडे नजरा लागल्या आहेत. २२ तारखेनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
....
सत्तेचे समीकरण जुळविणे सुरू
ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थीत व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे. हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाहीना, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीसुद्धा चांगलीच दमछाक होत आहे.
....